व्हॅलेंटाईन डे नाही, मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा… पंकज बालसंस्कार केंद्राचा स्तुत्य उपक्रम..

व्हॅलेंटाईन डे नाही, मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा… पंकज बालसंस्कार केंद्राचा स्तुत्य उपक्रम..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित,पंकज बालसंस्कार केंद्राच्या वतीने नो व्हॅलेंटाईन डे – मातृ-पितृ पूजन दिवस कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत अनेक चांगले सण, उत्सव आहेत. यामध्ये आई-वडिल, गुरू यांना आदर दिला आहे. परंतु काळाच्या ओघात आपल्या संस्कृतीचा विसर पडत आहे. व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस सगळीकडे उत्साहात साजरे केले जातात, परंतु माता पित्यांचा सन्मान देखील करायला हवा, यासाठी व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ दिन व पूजन उत्साहात करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक पंकज बोरोले हे होते तर प्रमुख वक्ते श्रीनिवास मराठे ( पुणे ) हे होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे , सौ. दिपाली बोरोले , एम व्ही पाटील , प्रो. आर आर अत्तरदे , व्ही आर पाटील , मिलिंद पाटील , गणेश साळुंखे आदी होते.प्रमुख वक्ते श्रीनिवास मराठे म्हणाले की,व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करायला हवा. शाळेमध्ये घराघरांमध्ये आणि प्रत्येक माणसापर्यंत हा संदेश जायला पाहिजे. आपला दिवसच आपल्या आई-वडिलांपासून चालू होतो, हीच आपली संस्कृती आहे. काळ बदलतो तसे काळासोबत अनेक गोष्टी बदलतात, परंतु आपले संस्कार आपण विसरता कामा नये.


त्यांनी विविध प्रकारची उदाहरणे व दाखले देऊन उपस्थित पालकांची मने जिंकली.सदर कार्यक्रम प्रसंगी चिमुकल्यांनी आपल्या आई बाबांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या झाकी सादर केल्या त्यात यशोदा – नंदलाल – श्रीकृष्ण , भक्त पुंडलीक , शंकर – पार्वती , श्री गणपती , कार्तिक स्वामी , लव – कुश – सीता , पाच पांडव व कुंती , छत्रपती शिवाजी महाराज – जिजामाता , राम – लक्ष्मण – भरत – शत्रुघ्न – दशरथ राजा , श्रावण बाळ – आई वडील इत्यादी झाकी पंकज बालसंस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यानी उपस्थित पालकांसमोर कृतीयुक्त सादर केल्या. उपस्थित पालकांनी चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ रेखा पाटील ( विभाग प्रमुख ) , सौ मीना माळी, छाया बारी , सौ. भावना दिक्षित , सौ योगिता कोळी , अनिता बऱ्हाटे , संध्या पाटील , जयश्री हिंगे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More