चोपडा रोटरी महोत्सव २०२६ मध्ये ब्रह्माकुमारीज् तर्फे चैतन्य नवदुर्गा देवींच्या झांकीचे भव्य उद्घाटन

चोपडा रोटरी महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेल्या चैतन्य नवदुर्गा देवींच्या झांकीचे उद्घाटन अत्यंत भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाले. अध्यात्म, संस्कृती व मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश देणारी ही झांकी महोत्सवातील विशेष आकर्षण ठरली आहे.

या झांकीचे उद्घाटन आदरणीय ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदीजी यांच्या पावन हस्ते करण्यात आले. यावेळी अरुण भाईजी गुजराथी, पंकज बोरोले, रोटरी क्लबचे अध्यक्ष रितीन जैस्वाल, आशीष गुजराथी, नीता अग्रवाल तसेच चोपडा ब्रह्माकुमारी केंद्राच्या मुख्य संचालिका मंगला दीदीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून नवदुर्गा देवींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडविण्यात आले. नवदुर्गा देवींच्या विविध रूपांमधून शक्ती, श्रद्धा, संयम, करुणा, पवित्रता आणि आत्मबल यांचे प्रतीकात्मक दर्शन झांकीतून साकारण्यात आले होते. स्त्रीशक्तीचे दिव्य स्वरूप आणि आत्मिक जागृतीचा संदेश या झांकीतून प्रभावीपणे मांडण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजात सकारात्मक विचार, मूल्यनिष्ठ जीवनशैली आणि आत्मपरिवर्तनाची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मार्गदर्शनपर भाषणात मीनाक्षी दीदीजी म्हणाल्या, “आजच्या धावपळीच्या जीवनात आत्मशांती, संयम आणि आध्यात्मिक शक्ती यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. नवदुर्गा देवींच्या प्रतीकातून प्रत्येक आत्म्याने आपल्या अंतर्गत दिव्य शक्तींचे जागरण करावे.”

रोटरी क्लबच्या वतीने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. झांकीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली असून भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चोपडा रोटरी महोत्सवाच्या माध्यमातून अध्यात्म व संस्कृतीचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा प्रभावी परिचय करून देणारा कार्यक्रम म्हणून त्याची दखल घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More