एक गाव, एक गणपती’: अंमळनेर तालुक्यातील आंचलवाडी गावाने जपली २१ वर्षांची अखंड परंपरा; सामाजिक एकतेचा वस्तुपाठ
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क अमळनेर (विशेष बातमीदार)
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकजूट जपण्याची एक आदर्श परंपरा अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी गावाने गेल्या दोन दशकांपासून कायम ठेवली आहे. सन २००५ मध्ये सुरू झालेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या स्तुत्य संकल्पनेने यंदा २१ व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही गावातील ‘सप्ताहाच्या चौकात’ गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गावातील प्रत्येक कुटुंब आणि तरुण वर्ग या उत्सवात हिरिरीने सहभागी होतो. वेगवेगळ्या गणेशमूर्ती बसवण्याऐवजी संपूर्ण गावाने एकत्र येऊन एकच उत्सव साजरा करण्याची ही पद्धत आंचलवाडीच्या सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनली आहे.
युवा शक्तीचा मोलाचा वाटा
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनात गावातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय आहे. ‘कुलस्वामिनी आई जागमाता मित्र मंडळ’ आणि ‘सेवेकरी गणेश मंडळ’ चे कार्यकर्ते नियोजन, व्यवस्थापन आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अत्यंत शिस्तबद्धपणे सांभाळतात. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी या परंपरेचा वारसा पुढे चालवत आहे.
सामाजिक संवादाचे केंद्र
“ही संकल्पना केवळ धार्मिक उपक्रमापुरती मर्यादित नसून गावातील परस्पर सहकार्य, संघटन कौशल्य आणि सामाजिक संवाद वाढवणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गेल्या २१ वर्षांत बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या, मात्र आंचलवाडीकरांनी आपल्या ‘एक गाव, एक गणपती’ या विचारांची वीण अधिकच घट्ट केली आहे, जे आजच्या काळात संपूर्ण तालुक्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे.












