चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (विशेष प्रतिनिधी):
चोपडा शहरातील उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शहरातील चोपडा-यावल रस्त्यावरील गट क्रमांक ११०१ वर तब्बल १६ दुकानांचे अनधिकृत व्यापारी संकुल उभारून ते भाडेतत्त्वावर दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मनमानी कारभाराविरोधात तक्रारदार विनायक पाटील यांनी नगरपरिषदेकडे तक्रार दाखल करताच पालिका प्रशासनाला जाग आली असून, लगेचच संबंधित संकुलाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रार दाखल होताच हालचालींना वेग
तक्रारदार विनायक पाटील यांनी २१ तारखेला चोपडा नगरपरिषदेचे नगर रचना विभागीय अभियंता यांच्याशी चेतन अहिराव यांची साडे अकरा वाजता भेट घेऊन या संकुलाविषयी चौकशी केली असता, सदर संकुलासाठी नगरपरिषदेकडे कुठलाही अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे अभियंता यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर २२ तारखेला विनायक पाटील हे या अनधिकृत संकुलासंदर्भात लेखी तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, नगर रचना विभाग प्रमुख चेतन अहिरराव यांनी २१ तारखेलाच दुफारी या संकुलाचा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सांगितले. तक्रार दाखल होताच अचानक प्रस्ताव दाखल झाल्याने उपनगराध्यक्षांनी सर्व नियमांची पायमल्ली करून हे संकुल उभारल्याचे सिद्ध होत आहे.
शहराचे लक्ष नगरपरिषदेच्या भूमिकेकडे
उपनगराध्यक्षांच्या या अनधिकृत बांधकामावर चोपडा नगरपरिषद आता काय भूमिका घेणार? अनधिकृत दुकाने नियमानुकूल (अधिकृत) करण्यासाठी नगरपरिषद नवी खेळी खेळणार की नियमानुसार कठोर कारवाई करत ही दुकाने हटवणार? याकडे आता संपूर्ण चोपडा शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
सुरक्षेचा बोजवारा: दुकानांसमोर धोकादायक विद्युत रोहित्र (DP)
या व्यापारी संकुलाच्या समोर सार्वजनिक सुरक्षेचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवून विद्युत रोहित्र (DP) बसवण्यात आले आहे. हे रोहित्र अत्यंत धोकादायक ठिकाणी असून, यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची किंवा जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता हे धोकादायक विद्युत रोहित्र तात्काळ तेथून हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
कडक कारवाईची मागणी
या संपूर्ण गंभीर प्रकरणात प्रशासनाने तात्काळ योग्य ती कडक कारवाई करावी आणि या तक्रारीवर आपल्या स्तरावरून काय कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल नियमानुसार निश्चित मुदतीत लिखित स्वरूपात द्यावा, अशी ठाम मागणी तक्रारदार विनायक पाटील यांनी केली आहे.
क्रमश…












