होम क्वारंटाइनचे अधिकार तहसीलदारांना : जिल्हाधिकारी राऊत 

जळगाव : कोरोनाची लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन करायचे असल्यास हे अधिकार तहसीलदारांनाच देण्यात आले आहेत. होम क्वारंटाइन करायचे झाल्यास संबंधितांच्या घरची परिस्थिती शासकीय निकषात बसत असेल, तर त्या परिस्थितीनुसार होम क्वारंटाइनची परवानगी देण्यात यावी, असे आदेश अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (ता. 10) दिले. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांतर्गत विविध विषयांसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. या वेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की कोरोना रुग्णांचे अहवाल लवकर येण्यासाठी ऍन्टिजन किटद्वारे टेस्ट करण्यावर भर राहणार आहे. मात्र हे करीत असताना ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांचीच या किटद्वारे तपासणी करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. लक्षणे असलेल्या रुग्णांची या किटद्वारे तपासणी केली तरी त्यांची पुन्हा स्वॅब घेऊन तपासणी करावीच लागते. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांचीच याद्वारे तपासणी केली जाणार आहे. यातून अहवाल लवकर येईल व रुग्णालयांमधील गर्दी कमी होऊन ताणही कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की कोरोनाच्या लढ्यात जे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची ऍन्टिजन किटद्वारे तपासणी करण्यावरही भर राहणार आहे. याद्वारे अहवाल तत्काळ येईल व संबंधित व्यक्ती निगेटिव्ह आल्यास त्याची पुन्हा कोरोनाच्या लढ्यात मदत होऊ शकणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे स्वॅब घेण्याची सूचना करीत त्यांच्या नोंद ठेवण्याचे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More