तहसील कार्यालय आवारातील चिंचेच्या डेरेदार वृक्षाची बेकायदेशीर कत्तल…
अनेक पक्षांसह पिल्लांना गमवावा लागला जीव.. पक्षीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी… संबंधितांवर गुन्हे दाखल करा अमृतराज सचदेव…
चोपडा प्रतिनिधी :—
चोपडा तहसील कार्यालय आवारात अनेक वर्षापासून चिंचेचा डेरेदार वृक्ष होता .ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सदर वृक्ष सावलीचा सहारा देत होता. त्या डेरेदार झाडाच्या अवतीभवती सिमेंटच्या ओटा देखील बांधण्यात आलेला होता व सदर डेरेदार वृक्षावर सुमारे 300 हून अधिक पक्षी आपली घरटी व पिल्लांसह वास्तव्यास होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तहसीलदार यांच्या कार्यालयासमोरील डेरेदार चिंचेचे वृक्ष कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत आर एफ ओ समाधान सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर विषय नगरपरिषदचा अखतारीतला सांगून हात झटकले. नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम यांना सदर घटनेबद्दल विचारणा केली असता, मला तुम्ही कॉल केला म्हणून समजले असे सांगून झाड तोडणे योग्य नसून चुकीचे असल्याचे सांगितले तर तहसीलदार अनिल गावीत यांना कॉल केला असता, त्यांनी कॉल रिसीव केले नाहीत व शेवटी त्यांनी आपला मोबाईल स्विच ऑफ देखील केला.

सदर वृक्ष तोडणी संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार तहसिलदार यांनी शहर तलाठी यांना तोंडी आदेश दिल्याचे समजते व शहर तलाठी यांनी कोतवाल यास रविवारी सुटीच्या दिवशी मजूर आणून वृक्ष तोडण्याचे तोंडी आदेश दिल्याचे समजते.
सदर घटनेबाबत पक्ष प्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून ते म्हणाले की, सदर प्रकारचे पक्षी चोपड्या शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात चिंचेच्या झाडावर व प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या जिनिंग आवारात देखील वास्तव्यास असल्याचे सांगितले .सदर पक्षी मार्च महिन्यात घरटे बांधण्यास सुरुवात करतात. घरटे बांधताना पक्षी खूप मेहनत घेत असतात .सदर डेरेदार चिंचेच्या वृक्षावर सुमारे 30 ते 40 या पक्षांची घरटी होती. सदर घरट्यांमध्ये अंडी व काही छोटे पिल्ले व काही मोठे पिल्ले व पक्षी देखील वास्तव्यास होते तरी निसर्ग प्रेम , पक्षी प्रेम व पक्षाबद्दल जिव्हाळा वेशीला टांगून सदर पक्षांच्या जीवाशी खेळून सदर प्रकार घडला असून पक्षी प्रेमींनी सदर घटनेच्या निषेध व्यक्त केला आहे .अनेक प्रकारचे पक्षी जखमी अवस्थेत होते .अनेक प्रकारचे पक्षी मृत पावले होते.

अशी बातमी पक्षी मित्रांना कळल्यावर वन्यजीव व पक्षी अभ्यासक हेमराज पाटील, सुशील अग्रवाल ,जयेश बडगुजर ,देवेंद्र बिऱ्हाडे, धनंजय बागुल ,लोकेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले व सदर प्रकार पाहून त्यांना मोठा धक्काच बसला पण त्यांनी अधिक वेळ न घालवता आर एफ ओ समाधान सोनवणे यांना मनुष्यबळ व वाहनाची मागणी केली व मेलेल्या पक्षांना व त्यांच्या पिल्लांना त्यांनी एका बाजूला केले . जखमी पक्षांना व पिलांना एका बाजूला केले व जखमी पक्षांना व पिल्लांना कसे जीवदान देता येईल यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न देखील केले व मेलेल्या पक्षी व पिल्लांना त्यांनी दफन देखील केले.
सदर चिंचेच्या झाडावर तीनशे विविध प्रकारचे पक्षी व पिल्ले घरट्यांसह वास्तव्यास होती. निसर्गाची खूप मोठी हानी झाली असल्याचे निसर्ग प्रेमीनी म्हटले आहे .तहसील आवारातील डेरेदार चिंचेचे वृक्ष कोणाच्या सांगण्यावरून जमीनदोस्त करण्यात आले हा प्रश्न मात्र अजून गुलदस्त्यात आहे तरी सदर बाबीची चौकशी होऊन पक्षांच्या व त्यांच्या पिल्लांच्या जीवाशी खेळणाऱ्या व त्यांच्या जीव घेणाऱ्या, त्यांच्या निवारा उध्वस्त करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी भ्रमणध्वनीवर आरएफओ समाधान सोनवणे यांच्याकडे याप्रकरणी गंभीर तक्रार केली असून यात कोणी कितीही लहान किंवा मोठा माणूस असो त्यास गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करणे गरजेचे आहे या संदर्भात सोनवणे साहेबांनी ग्वाही दिली आहे कोणी कितीही मोठा माणूस असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करणार व त्यास मी अटक करणारच या प्रकरणाकडे संपूर्ण चोपडा तालुक्याचे लक्ष लागून आहे
खूप मोठ्या संख्येने पक्षी दगावले आहेत. काही जिवंत आहेत तर काहीवर विविध प्रकारचे उपचार सुरू आहेत .मेलेल्या पक्षांचे दफन करण्यात आले आहे . यापुढे झाड तोडण्यापूर्वी रितसर परवानगी घेण्यात यावी व जैवविविधता नष्ट होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी. झालेल्या प्रकाराबद्दल वन्यजीव व पक्षी अभ्यासक हेमराज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे व यापुढे असा प्रकार होऊ नये असे देखील त्यांनी सुचविले आहे….













