गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचू न दिल्याने १२ वर्षीय बालकाची आत्महत्या; घुमावल येथील दुर्दैवी घटना
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा (विशेष प्रतिनिधी):
गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचण्यास आई-वडिलांनी नकार दिल्याच्या रागातून एका १२ वर्षीय बालकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घुमावल (ता. चोपडा) येथे घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश संजय पाटील (वय १२, रा. घुमावल, ता. चोपडा) असे मृत बालकाचे नाव आहे. जयेश हा चोपडा येथील पंकज विद्यालयात इयत्ता ६ वी मध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील शेती व्यवसाय करतात. जयेश हा घरातील लहान मुलगा होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत नाचण्यासाठी त्याने आई-वडिलांकडे हट्ट धरला होता, मात्र आई-वडिलांनी त्याला नाचू दिले नाही. याच रागाच्या व संतापाच्या भरात जयेशने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मोबाईलचे व्यसन आणि तापट स्वभावआई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेशचा स्वभाव मूळचा तापट व एकनांदी (हट्टी) होता. तो सतत मोबाईलवर रिल्स पाहत असे आणि अभ्यासात साधारण होता. गावात सतत काही ना काही खोड्या काढण्याची त्याची सवय होती. मोबाईलचे अतिसेवन आणि स्वभावातील चिडचिड यामुळे किरकोळ कारणावरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
या घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अ.मृ.रजि नं. ४८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस करत आहेत. अवघ्या १२ वर्षांच्या बालकाने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे घुमावल परिसरासह पंकज विद्यालयात हळहळ व्यक्त केली जात आहे












