चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):
चोपडा तालुक्यातील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीला यंदा ५८ लाख रुपयांचा नफा झाला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस या सूतगिरणीत थेट खरेदी केला जाणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. सहकार क्षेत्रातील हा एकमेव सुरू असलेला प्रकल्प शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, असे प्रतिपादन सूतगिरणीचे चेअरमन व माजी आमदार कैलासबापू पाटील यांनी केले.
तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना कैलास पाटील म्हणाले की, सूतगिरणीला लवकरच कर्जमुक्त करण्यात येईल. साखर कारखाना आणि सूतगिरणी हे दोन्ही प्रकल्प तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेत अजेंड्यावरील सर्व सात विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी वर्गाकडून बळीराम लक्ष्मण पाटील व शामराव पोपट पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, सर्व संचालक मंडळ, शेतकरी संघाचे संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयांचे वाचन केले. प्रास्ताविक करताना संचालक संजय पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा मांडला. सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार साहित्यिक रमेश पाटील यांनी मानले.












