दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्ज प्रकरण: चोपड्यात आंबेडकरी समाजातर्फे तीव्र निषेध मोर्चा #केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा (विशेष प्रतिनिधी)
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ चोपडा तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ चोपड्यात भव्य निषेध मोर्चा काढून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचाराचा निषेध नोंदवत आंबेडकरी समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार भाऊसाहेब थोरात व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भिसे साहेब यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या इशारावरून हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच या अत्याचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मा. गोपाळराव सोनवणे, मा. अशोक बाविस्कर, मा. दिवाणजी साळुंखे, मा. संजय अहिरे, मा. शालिग्राम करंदीकर, ॲड. निलेश भालेराव, मा. समाधान सपकाळे, मा. दीपक वानखेडे, मा. सचिन बाविस्कर, मा. मुकेश बागुल, मा. सपकाळे साहेब यांच्यासह चोपडा तालुक्यातील आंबेडकरी समाजातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












