सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चोपडा पोलिसांचा डीजे चालकांना दणका; नियम मोडल्यास थेट गुन्हे दाखल करून साहित्य होणार जप्त
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा
आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी शहरातील डीजे (DJ), साऊंड सिस्टिम चालक, मालक आणि ऑपरेटर्स यांना कायदेशीर नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६८’ प्रमाणे या नोटिसा जारी केल्या आहेत. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नोटीसमध्ये नमूद केलेले महत्त्वाचे नियम आणि ध्वनीमर्यादा:
सर्वोच्च न्यायालय आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण)
नियम, २००० नुसार आवाजाची मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.शांतता क्षेत्र (रुग्णालये, न्यायालये, शाळांचा १०० मीटर परिसर): दिवसा ५० dB | रात्री ४० डबा,निवासी क्षेत्र: दिवसा ५५ dB | रात्री ४५ dB व्यापारी क्षेत्र: दिवसा ६५ dB | रात्री ५५ dB
आरोग्यावरील गंभीर धोक्यांकडे लक्ष वेधले:
डीजेच्या बेस (Base) आणि अतिउच्च आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम पोलिसांनी या नोटीसमध्ये सविस्तरपणे अधोरेखित केले आहेत.
सततच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो.हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका वाढतो.उच्च रक्तदाब, मानसिक ताण आणि निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवतात.गरोदर महिलांमध्ये गर्भपाताचा धोका आणि लहान मुलांच्या नाजूक कानांचे नुकसान होऊ शकते.
डीजेसोबत वापरल्या जाणाऱ्या तीक्ष्ण लेझर लाईट्समुळे डोळ्यांच्या पडद्याला (Retina) गंभीर इजा होऊन अंधत्व येण्याचाही मोठा धोका असतो.
नियम मोडल्यास होणारी कडक कायदेशीर कारवाई:
पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व कायदेशीर नियमांचे पालन न केल्यास अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले आहे:
साहित्य व वाहन जप्ती: पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि ध्वनी प्रदूषण नियम २००० अन्वये संपूर्ण डीजे सिस्टिम, अॅम्प्लीफायर, स्पीकर आणि ते वाहून नेणारे वाहन जागेवरच जप्त केले जाईल.फौजदारी गुन्हा व दंड: सार्वजनिक उपद्रव करणे आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. दोषी आढळल्यास तुरुंगवास आणि मोठा आर्थिक दंड एकाच वेळी होऊ शकतो.
परवाने रद्द करण्याची शिफारस: संबंधितांचे व्यवसाय परवाने आणि वाहन चालवण्याचे परवाने कायमचे रद्द करण्यासाठी आरटीओ (RTO) आणि संबंधित विभागाकडे शिफारस केली जाईल. दिनांक २४ जुलै २०२६ रोजी उबाळे येथील ‘शिवाजी बँड’चे ज्ञानेश्वर गोपाळ धनगर यांच्यासह इतर चालकांना या नोटिसा देण्यात आल्या असून, सणांच्या काळात सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्यांवर आता चोपडा पोलीस थेट कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली












