४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात, अनुसूचित जातीची एकता टिकवण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या व संविधानाच्या रक्षणासाठी तसेच अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे हित जपण्यासाठी जळगाव येथे ‘जनआक्रोश महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी चोपडा येथील स्टेट बँकेसमोर, गौतमनगरजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.
जळगाव येथील शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक येथून रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता हा ऐतिहासिक ‘जनआक्रोश महामोर्चा’ निघणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील ५९ जातींचे हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. आपल्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी अनुसूचित जातीतील सर्व घटकांनी व संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने या बैठकीत करण्यात आले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला माजी नगरसेवक व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक मुकुंदराव सपकाळे, सतीश गायकवाड, समाधान सपकाळे, अशोक बाविस्कर, गोपालराव सोनवणे, संतोष अहिरे, अरुण मोरे (नाना), सोपान मोरे, विनोद खजूरे, जितेंद्र विसावे यांच्यासह ५९ जातींमधील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि संविधानवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












