कवी अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला पहिला राज्यस्तरीय ‘साहित्य गौरव पुरस्कार’ प्रदान #नाशिकच्या हुतात्मा स्मारकात पुरस्कार सोहळा संपन्न..
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):
चोपडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या काव्यसंग्रहाला मातोश्री दगुबाई उगले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय ‘साहित्य गौरव पुरस्कार’ ह. भ. प. बापूराव महाराज उगले यांच्या हस्ते नुकताच उत्साहात प्रदान करण्यात आला. रोख ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक येथील हुतात्मा स्मारकात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे हे होते. व्यासपीठावर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कवी रवींद्र मालुंजकर, परीक्षक कवी विवेक उगलमुगले आणि कवयित्री सौ. जयश्री वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कविता जाणीवपूर्वक लिहिण्याचा साहित्य प्रकार – विजयकुमार मिठे अध्यक्षीय भाषणात बोलताना विजयकुमार मिठे म्हणाले, “कविता हा जाणीवपूर्वक लिहिण्याचा साहित्य प्रकार आहे. कवितेतील शब्द वाचकांच्या काळजापर्यंत पाझरले पाहिजेत; या पाझरणाऱ्या शब्दांनाच खऱ्या अर्थाने कवितेचे रूप प्राप्त होते.”
कविता माझ्या लेकीसारख्या – अशोक सोनवणे
पुरस्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती कवी अशोक सोनवणे भावूक होत म्हणाले, “मी माझ्या कवितांना लेकी मानतो. कारण त्या मला सुखात साथ देतात आणि दुःखात सोबत करतात. हा मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्या मातेच्या संस्कारांचा आणि शिकवणुकीचा यथार्थ गौरव आहे.”
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राचार्य राजेश्वर शेळके यांनी केले. या कार्यक्रमास चित्रकार धनंजय गोवर्धने, कवी तथा नाट्यकलावंत सी. एल. कुलकर्णी, निवृत्त शिक्षणाधिकारी व्ही. जी. बोरस्ते, प्रा. के. डी. शिंदे, कवी प्रशांत केंदळे, उगले कुटुंबीय आणि परिसरातील रसिक-साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












