चो सा का निवडणूक…
राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ सुरूच, अखेरच्या दिवशी ११० उमेदवारांची माघार तर ३४ उमेदवार निवडणुक रिंगणात…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :- सचिन जैस्वाल
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक तालुक्यात सध्या चर्चा आणि कुतुहलाचा विषय ठरू पाहत आहे. १६५ कोटी रुपये कर्जात आणि बारामती अॅग्रोकडे भाडेतत्त्वावर असणाऱ्या या साखर कारखान्यावर संचालक म्हणून जाण्यासाठी, या प्रकल्पावर वर्चस्व नेमकं कुणाचं राहील, यासाठी सुरू असलेली विचित्र चढाओढ, तासातासाला बदलणारे गणिते तालुक्यांत चर्चेचा विषय ठरले आहेत.

सदर निवडणुकीत उत्पादक सभासद मतदार संघ १५ जागा, उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदार संघ १ जागा,महिला मतदार संघ २, ओबीसी मतदार संघ १, अनु.जाती, जमाती सदस्य १, वि.जा.भ.ज.व विमाप्र मतदार संघ १ अशा २१ जागांसाठी निवडणूक होत आहे.अर्ज माघारची तारीख १६ ते ३० जानेवारी पर्यंत होती पण आज शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तुंबड गर्दी उडाली होती. माघारीची वेळ संपल्यावर सुध्दा काही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण काहींना यश आले नाही.

शेवटच्या दिवशी तब्बल ११० उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता २१ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. शेवटच्या क्षणी प्रविणभाई गुजराथी यांनी माघारीसाठी आपला अर्ज दिला पण तो पर्यंत वेळ संपली होती त्यामुळे आता उत्पादक सभासदांचा मतदार संघ – चोपडा गटात प्रविणभाई गुजराथी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
आतापर्यंत उत्पादक सभासदांच्या मतदार संघात अडावद गट गोरगावले बुद्रुक गट चहार्डी गट बिनविरोध करण्यात यशस्वी झाले आहेत तर चोपडा गट व हातेड गटात चुरशीची लढाई होण्याची दाट शक्यता आहे तसेच महिला राखीव गटात ४ , इतर मागासवर्ग गटात ३, अनुसूचित जाती जमाती गटात ३, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग गटात २, तसेच उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदार गटात ४ अशा गटात एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत तरी येणाऱ्या १२ तारखेला मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करून साखर कारखान्यावर संचालक पदी पाठवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

पात्र उमेदवारांना निशाणी वाटप ३१ जानेवारी १२ फेब्रुवारी मतदान व १३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. चोपड़ा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मागील वेळी झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी देखील निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना काहींनी चाणक्य नीती वापरून ते शक्य होऊ दिले नाही…

स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला चोसाका आजमितीस १६५ कोटी रुपयांच्या तोट्यात आहे, त्यावर चर्चा करताना कोणी दिसत नाही. कर्जात बुडालेला आणि पंधरा वर्षांसाठी बारामती अॅग्रोकडे भाडेतत्त्वावर असलेल्या चोसाकावर निवडून जाऊन नेमकं काय फलीत होणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारामती अॅग्रोकडून दरमहा मिळणारे भाडे, त्या भाड्यातून कर्जाचा हप्ता, शेतकऱ्यांची देणी, कर्मचारीवर्गाची थकबाकी हे व्यवहार नियमित करणे हे सोडले, तर संचालक मंडळाच्या हातात कोणतेच अधिकार नसावेत, मग तरीही चोसाकावर निवडून जाण्यासाठी इतकी रस्सीखेच होणे म्हणजेच ‘कारखाना भाड्यावर आणि भाऊगर्दी घोड्यावर असे म्हणावे लागेल…












