चोपड्यात दूध उत्पादक चेअरमन कार्यशाळा उत्साहात #रोहित निकम यांचा गुणवत्तापूर्ण पशुखाद्यावर भर – विशेष योजनांची ग्वाही…

चोपड्यात दूध उत्पादक चेअरमन कार्यशाळा उत्साहात
रोहित निकम यांचा गुणवत्तापूर्ण पशुखाद्यावर भर – विशेष योजनांची ग्वाही

चोपडा, १२ ऑगस्ट – जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था चोपडा विभागाच्या वतीने चेअरमन कार्यशाळेचे आयोजन चोपड्यात उत्साहात करण्यात आले. तालुक्यातील विविध दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन व सचिव यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक रोहित निकम होते. यावेळी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे, तावसे संस्थेचे चेअरमन विवेक पाटील, रामेश्वर संपुले, प्रल्हाद पाटील, रुंधाटीचे नितीन पवार, चहार्डीचे सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारत माता, गो माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थांच्या चेअरमनमार्फत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच २०२४-२५ मध्ये तालुक्यातून सर्वाधिक म्हैस/गाय दूध पुरवठा करणारी तसेच दूध शितकरण केंद्र/विभागातून सर्वाधिक पशुखाद्य खरेदी करणारी प्रथम क्रमांकाची संस्था व चेअरमन यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण पशुखाद्य आणि वेळेवर उपलब्धतेवर भर

कार्यशाळेचे अध्यक्ष रोहित निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी गुणवत्तापूर्ण व वेळेवर उपलब्ध होणारे पशुखाद्य अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन शक्य होते. दूध उत्पादक संस्थांनी विकास दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर भर दिल्यास संस्थांना आर्थिक लाभ मिळेल.”

निकम यांनी पुढे सांगितले की, दूध संघाच्या ५५ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत मोठी साखळी तयार झाली असून, त्याचा योग्य विनिमय करून संस्थांनी एकमेकांना सहकार्य करावे. राज्य शासनाकडे पशुखाद्यासाठी तालुका पातळीवर गोडाऊन आणि अर्थसहाय्य , जनावरांसाठी अर्थसहाय्य
, सबसिडी उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच सातत्याने दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांसाठी विशेष योजना, डिपॉझिट शेअर कॅपिटल रूपांतर, पशुखाद्य सबसिडी यासारख्या उपक्रमांची अपेक्षाही व्यक्त केली.

संस्थांच्या अडचणींवर सखोल चर्चा

कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत विविध अडचणी व त्यावर उपाययोजना यावर सखोल चर्चा केली. कार्यशाळेत दूध संघाची वाटचाल, दूध शितकरण केंद्रांची प्रगती, संस्थांच्या अडीअडचणी आणि आगामी आव्हाने यावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापक जयेश पाटील यांनी केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिलीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ईश्वंकू पाटील , निकितेश निर्मळ , डॉ. विमलेश रॉय , गजानन ढाले, राजेंद्र वाघ , केशव पाटील , चोपडा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More