चोपडा येथे हिंदु रक्षा समितीच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजनभगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवणार्यांना हिंदू समाजच अद्दल घडवेल ! –  विक्रम भावे

चोपडा येथे हिंदु रक्षा समितीच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन
भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवणार्यांना हिंदू समाजच अद्दल घडवेल ! – श्री. विक्रम भावे, ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे लेखक


चोपडा(प्रतिनिधी) भगवा आतंकवादाचा बागुलबुवा पसरवण्यासाठी मागील काही वर्षांत अनेक केसेस मध्ये खऱ्या आरोपीना मोकाट सोडून विनाकारण निष्पाप हिंदूंचे बळी ज्यांनी घेतले, तसेच अनेक हिंदू कुटुंबाची आयुष्य उध्वस्त केली, त्या सर्वांचे कारनामे आता बाहेर पडू लागले आहेत. अखेर सत्य सर्वांसमोर येणारच आहे, त्यामुळे भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवून संपूर्ण हिंदू समाजाला ज्यांनी बदनाम केले अशाना हिंदू समाजच अद्दल घडवेल, यावर माझी ठाम श्रद्धा आहे, असे परखड विधान ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांनी केले. चोपडा येथील हॉटेल श्रीनाथ प्राईड येथे हिंदु रक्षा समिती आयोजित ‘भगव्या आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.


आपल्या विषयात विक्रम भावे पुढे म्हणाले की, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’ने माझ्यावर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर खोटे आरोप लावून आमचा मानसिक छळ केला; पण मी डगमगलो नाही. ज्या खोट्या पुराव्यांच्या आधारावर आरोपपत्र सिद्ध झाले, ते पहाता हा खटला केवळ मृत व्यक्तीचे ‘मोठे नाव’ असल्यामुळेच उभा राहिला. पोलिसांना कुणालाही पकडून शिक्षा द्यावीच लागते, हीच यंत्रणांची मानसिकता झाली आहे.


वर्तमान राज्यसरकारने हिंदूंना बदनाम करणार्यांवर कठोर कारवाई करावी ! – प्रशांत जुवेकर
वर्ष २००९ मध्ये गोवा येथे झालेल्या एका स्फोटात निर्दोष असतानाही केवळ हिंदुत्वाचे कार्य करतो यासाठी माझ्यासारख्या अजून ५ जणांना अटक केली गेली. ४ वर्षे कारावास भोगल्यानंतर आमची निर्दोष मुक्तता झाली. माझ्यासारख्या अनेक निरपराध हिंदूंची आयुष्य उध्वस्त करणाऱ्या, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे पाप करणाऱ्या तत्कालीन हिंदुद्रोही राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर वर्तमान राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, तरच असे धाडस ते पुन्हा करणार नाहीत.यावेळी चोपडा तालुका व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतभाई सचदेव, सुनिल बरडिया, प्रवीण जैन, अनिल वानखेडे तसेच भाजपा माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहर प्रमुख नरेंद्र पाटील, गजेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते मान्यवर विक्रम भावे, प्रशांत जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला.


सातपुडा परिसरात ख्रिश्चन धर्मात धर्मातरण च्या घटना घडतं असता या परिसरातील 16 कुटूंबातील लोकांना परत हिंदु धर्मात प्रवेश करून त्याची शुद्धी करून परत आणले म्हणून चोपडा तालुक्यातील शेनपाणी येथील प्रविण बारेला, जामलाल महाराज यांचा विशेष सत्कार मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. तसेच चोपडा शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत आदर्श व शिस्तप्रिय मिरवणूक काढल्याने समता नगर गणेश मित्र मंडळ, संत सावता माळी गणेश मित्र मंडळ, आई भवानी माता गणेश मित्र मंडळ यांचा आदर्श विसर्जन मिरवणूक म्हणून सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. व्याख्यानानंतर अनेकांनी पुस्तकाचे लेखक  विक्रम भावे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यावरील अत्याचारांविषयी जाणून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सुधाकर चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ शेकडोहुन अधिक धर्मप्रेमी नागरिकांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More