निपुण कार्यशाळा, समूह साधन केंद्र, नागलवाडी

दि.६रोजी समूह साधन केंद्र चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे केंद्रांतर्गत सर्व शाळांच्या इयत्ता २ री ते ५ वीच्या शिक्षकांसाठी निपुण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन, लेखन व गणितीय कौशल्यांमध्ये निपुण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

याप्रसंगी चोपडा गटाच्या गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांनी यापूर्वीच आदिवासी भागातील शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने आदिवासी बहुल असलेल्या नागलवाडी समूह साधन केंद्राच्या कार्यशाळेला त्यांनी भेट देऊन उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अजित पाटील व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जे. पी. पाटील हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांचे “बुके विथ बुक” देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

कार्यशाळेच्या सुरुवातीस समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना प्रवीण स्तरापर्यंत नेण्यासाठी,
दररोज दोन तासिका निपुणसाठी घ्याव्यात,प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र नोंद ठेवावी,विद्यार्थी-निहाय स्वतंत्र कृती आराखडा व कृती कार्यक्रम प्रत्येक शिक्षकाने तयार करावा,
यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत अपेक्षित प्रगती साधता येईल. तसेच त्यांनी दि. ५ मार्च २०२५ रोजी च्या शासन निर्णयानुसार निपुण चाचणीचे विश्लेषण करून अध्ययन- अध्यापन नियोजन कसे करावे, याचेही मार्गदर्शन केले.

विशेष सत्कार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुळ्याउतार येथील शिक्षक अमित डुडवे यांनी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढविला. त्याबद्दल गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पंचायत समिती शिक्षण विभाग व समूह साधन केंद्र नागलवाडीच्या वतीने पुस्तक व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अंजली बर्गे यांनी आपल्या भाषणात कुमठे बिटच्या उदाहरणाचा उल्लेख करत आदिवासी भागातील शिक्षकांना उद्देशून मोलाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, ज्ञानरचनावाद ही संकल्पना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूल हे केवळ मातीचा गोळा नसून, मूल स्वतःच ज्ञानाचा निर्माता आहे. त्यामुळे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून ज्ञानरचनावादाचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच आपला वर्ग, आपली शाळा आणि आपले समूह साधन केंद्र निपुण कसे होईल, यासाठी प्रत्येक शिक्षकाने मनापासून व सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले.
समारोपप्रसंगी अंजली बर्गे यांनी निपुण महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध, विद्यार्थी-केंद्रित व सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन करत सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

निपुण उद्दिष्टपूर्तीसाठी ही कार्यशाळा शिक्षकांसाठी अत्यंत मार्गदर्शक, प्रेरणादायी व दिशादर्शक ठरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More