चोपडा (प्रतिनिधी):
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, याची प्रचिती चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाच्या निकालाने दिली आहे.नुकत्याच ऑनलाइन जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत (SSC) परीक्षेच्या निकालात कु. स्वरा विनीत हरताळकर हिने १००% गुण मिळवून विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. स्वरा ही केवळ विद्यालयातच नव्हे, तर संपूर्ण चोपडा तालुक्यात प्रथम येण्याचा मानकरी ठरली आहे.
विवेकानंद विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यार्थ्याने १००% गुणांचा टप्पा गाठल्याने संपूर्ण चोपडा शहरात आनंदाचे भरते आले आहे. आपल्या लाडक्या लेकीच्या या ऐतिहासिक यशाने पालकांचे मन अभिमानाने भरून आले
आहे. “आम्ही पाहिलेल्या स्वप्नाच्या दिशेने आज स्वराने पहिले पाऊल टाकले आहे. तिच्या कष्टाचे आज चीज झाले असून, तिने मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे:” अशी कृतज्ञतापूर्ण भावना तिच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.

गुणवत्तेची परंपरा कायम: २३ विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पारकेवळ स्वराच नव्हे, तर शाळेच्या इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाची परंपरा दिमाखात कायम ठेवली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९९.२८% लागला असून, तब्बल २३ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे.विद्यालयाचे इतर मानकरी:
स्वराच्या या ऐतिहासिक यशासोबतच खालील विद्यार्थ्यांनीही दैदिप्यमान कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे:
कु. सानवी अतुल पाटील: ९७.८०% (विद्यालयात द्वितीय)
चि. हर्षल भरत पाटील: ९७.६०% (विद्यालयात तृतीय)
ऋतुजा किशोर पाटील: ९७.६०% (विद्यालयात तृतीय)
सोहम हितेश जैन: ९७% (विद्यालयात चतुर्थ)
कौतुकाचा वर्षाव:
“विद्यार्थ्यांची अहोरात्र मेहनत, पालकांचे व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा हा परिपाक आहे,” असे गौरवोद्गार शाळेच्या वतीने काढण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वराची ही यशोगाथा तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळात नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर आणि सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच
विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पवन लाठी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, संजय सोनवणे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी. पाटील, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या भारती पंजाबी, गौरी शुक्ल, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती दीक्षित व योगिता केंगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












