दि 26 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पवन देसले व पथक सहायक पोलीस निरीक्षक युवराज वाळुंज, कॉनस्टेबल विलास पारधी,कॉनस्टेबल निलेश वाघ यांना चोपडा शहरातील सुंदरगढी भागातील भिलवाडा येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली असता घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून यशस्वीरित्या बालविवाह थांबवला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शहरात एका ठिकाणी बालविवाह होणार होता.घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विवाह रोखला. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने हा विवाह बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विवाहाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या वयापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा विवाह हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, बालविवाह करणे, लावून देणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. बालविवाह करणारे वर-वधू, त्यांचे पालक, नातेवाईक, लग्न लावणारे भटजी, पत्रिका छापणारे, मंगल कार्यालय व्यवस्थापक, केटरर्स आणि उपस्थित असणारे सर्व दोषी मानले जातात. या कारवाईत पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. “बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी,” असे आवाहन चोपडा शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.












