चोपड्यात : व्याजाच्या पैशांसाठी तलाठ्याला मानसिक त्रास; ९ जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र9 न्युज नेटवर्क चोपडा | प्रतिनिधी
चोपडा येथील लोणी पंचक सजाचे तलाठी असलेल्या एका महसूल अधिकाऱ्याला व्याजाच्या पैशांसाठी वारंवार फोन करून शिवीगाळ करणे, धमकावणे आणि प्रचंड मानसिक त्रास देणे या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात ९ संशयित आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार अरविंद लिलाधर जाधव (वय ३२, रा. शिव कॉलनी, चोपडा) हे लोणी पंचक येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे आरोपींकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात रक्कम घेतली होती. मात्र, त्यानंतर आरोपींनी अवाजवी व्याजाची मागणी करत त्यांच्याकडे वसुलीचा तगादा लावला. ७ जानेवारी २०२२ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपींनी वारंवार फोन करून, गुगल पेद्वारे आणि थेट भेटून शिवीगाळ व धमक्या दिल्या.
आत्महत्येचा प्रयत्न
आरोपींकडून होणाऱ्या या अनन्वित त्रासाला कंटाळून २४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास फिर्यादी यांनी चोपडा येथील एका हॉटेलजवळील वडाच्या झाडाखाली विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच स्वतःच्या हातावर धारधार ब्लेडने गंभीर जखमाही करून घेतल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी जळगाव येथील धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर जिल्हापेठ पोलिसांनी जबाबाची नोंद करून हे प्रकरण चोपडा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.
हे आहेत नऊ आरोपी:
१) सनी ऊर्फ संदीप प्रकाश शिरसाठ (रा. भिमनगर, चोपडा), २) बंटी ऊर्फ अशोक कैलास मैराळे (एस.टी. कंडक्टर, रा. श्रीराम नगर, चोपडा), ३) कल्पेश दिलीप थोरात (रिकव्हरी एजंट, रा. सिद्धार्थनगर, शिरपूर), ४) रूपेश गोकुळ भालेराव (रा. पंचशील नगर, चोपडा – याच्यावर यापूर्वी ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत), ५) शामकांत भाऊराव जाधव (रा. शिंदेवाडा, चोपडा), ६) नरेश कैलास साळुंखे (रा. वडगाव, चोपडा), ७) ज्ञानेश्वर रामदास सोनवणे (रा. धानोरा), ८) निलेश पांडुरंग वाघोदे (रा. डिफेन्स कॉलनी, चोपडा), ९) मंगल पांडुरंग पाटील (रा. अरुण नगर, चोपडा).
पोलीस कारवाई
या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश हिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे चोपडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.












