पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट; MIM कडून चोपडा पोलीस ठाण्यात निवेदन
महाराष्ट्र9 न्युज नेटवर्क चोपडा | प्रतिनिधी :
सोशल मीडियावर पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत MIM चोपडा तालुक्याच्या वतीने चोपडा शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात , एका सोशल मीडिया वापरकर्त्याने पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून, समाजात तणाव, वैमनस्य निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारीत संबंधित सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ अथवा अन्य सामग्रीची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील लागू तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये प्राथमिक स्वरूपात कलम 196 (धर्म, जात, भाषा आदी आधारांवर वैमनस्य निर्माण करणे), कलम 299 (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम 353(2) (सार्वजनिक उपद्रव किंवा समाजात अस्थिरता निर्माण करणारी माहिती प्रसारित करणे) या कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे.
सदर तक्रार चोपडा शहर पोलीस ठाण्यात 26 जून 2026 रोजी स्वीकारण्यात आली असून, या प्रकरणी पुढील चौकशी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.












