चोपडा: प्रभाग क्र. १३ मध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराला मोठा प्रतिसाद; ३१० नागरिकांची नोंदणी
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा:
जनतेच्या सेवेसाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी, मल्हारपुरा येथील प्रभाग क्र. १३ मध्ये ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक २५, २६ आणि २८ जून रोजी आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश माळी महासंघाचे सदस्य श्री. नरेश लक्ष्मण महाजन आणि भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका सौ. संध्या नरेश महाजन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. नागरिकांना सरकारी योजनांची सुविधा त्यांच्या घराजवळच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे ३१० नागरिकांनी एनसीएमसी कार्डासाठी यशस्वी नोंदणी केली. नागरिकांना लांब न जाता आपल्याच प्रभागात ही सुविधा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशाबद्दल बोलताना नरेश महाजन आणि संध्या महाजन म्हणाले की, “नागरिकांच्या सुविधेसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. जनहित आणि विकासाची कामे भविष्यातही अशाच पद्धतीने सातत्याने राबविली जातील.”
या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांची कामे वेळेत आणि सोयीस्करपणे पूर्ण झाल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.












