चोपडा तालुक्याचा इतिहासात प्रथमच तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा निलंबनाची मागणी
महाराष्ट्र9 न्युज नेटवर्क चोपडा:
चोपडा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तहसीलदारांच्या कारभाराविरुद्ध संपूर्ण शहर एकवटले आहे. तालुक्यातील वाढता भ्रष्टाचार, वाळू माफिया आणि रेशन माफियांच्या संगनमताने सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन पुकारले.
भ्रष्टाचाराचे नवनवीन कारनामे
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. गरताड येथील शेतकऱ्याकडून जमिनीच्या वादाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल ६० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार प्रसारमाध्यमांकडे करण्यात आली आहे. तसेच, सरकारी रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करून गरिबांच्या हक्काच्या अन्नावर डल्ला मारला जात असल्याचे संतापजनक प्रकार उघडकीस आले आहेत.
वाळू माफियांचे अभय अन् पत्रकारांना धमकी
चोपडा तालुक्यात वाळू माफियांचे प्रस्थ वाढले असून, या बेकायदेशीर धंद्यांना तहसीलदार थोरात यांचेच पाठबळ असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या वाळू माफियांच्या विरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी तहसीलदार आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. तहसीलदार आपल्या हाताखालील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून, पत्रकारांना भविष्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महसूल मंत्र्यांकडेही तक्रार
या आंदोलनाची तीव्रता पाहता, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी थेट महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सर्वपक्षीय निवेदन प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे.
”तहसीलदार थोरात यांचे निलंबन आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी,” अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. चोपडा तालुक्यातील महसूल विभाग आता या भ्रष्टाचारामुळे बदनाम झाला असून, जोपर्यंत तहसीलदार थोरात यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा पवित्रा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.












