चोपडा तालुक्यात महावितरणाच्या हलगर्जीपणाचा फटका; शेतात विजेचा खांबात विदयुत प्रवाह उतरल्या मुळे बैलाचा मृत्यू
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा:
चोपडा तालुक्यातील नागलवाडी शिवारात महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २९ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पेरणीच्या कामात व्यस्त असताना, महावितरणाच्या विद्युत खांबात उतरलेल्या करंटमुळे एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नागलवाडी शिवारात शेतकरी चंद्रशेखर पाटील हे आपल्या शेतात पेरणीचे काम करत होते. दरम्यान, शेतातील महावितरणाच्या विद्युत खांबात तांत्रिक कारणास्तव वीज प्रवाह उतरला होता. पेरणी करत असताना पाटील यांच्या बैलाचा अचानक खांबाला स्पर्श झाला. खांबात असलेला तीव्र विद्युत प्रवाह थेट बैलाच्या शरीरात शिरल्याने त्याला जोरदार झटका बसला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
शेतकऱ्यांमध्ये संताप
ऐन पेरणीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी चंद्रशेखर पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा जीवघेणा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित खांबाची देखभाल व दुरुस्ती वेळीच केली असती, तर हा प्रकार टाळता आला असता, असे संतप्त मत परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
या घटनेबाबत प्रशासनाने त्वरित पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागलवाडी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.












