जळगाव: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; सहनिबंधकाच्या घरी सापडले पावणे तीन कोटी पेक्षा अधिक चे घबाड सापडले
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क
जळगाव: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जळगाव येथील सहनिबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांच्या जळगावातील निवासस्थानातून तब्बल २,९४,८४,८७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी किरण चौधरी यांना १०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. याप्रकरणी त्यांच्यावर अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील तपासासाठी जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली. दरम्यान, घरातील काही मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे हटवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एसीबीच्या पथकाने प्रसंगावधान राखत ही कारवाई पूर्ण केली.
काय सापडले जप्तीमध्ये?
एसीबीच्या जळगाव पथकाने केलेल्या झडतीमध्ये खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
रोख रक्कम: १,९३,८४,६३० रुपये.
सोने: ५०,७६,१३५ रुपये किमतीचे ४२२.१०० ग्रॅम सोने.
चांदी: ३१,४९६ रुपये किमतीचे १४५.५०० ग्रॅम चांदीचे दागिने.
इतर: ११,५२,७६७ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या आणि ६,२९,८४९ रुपयांच्या घरातील वस्तू.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक वनिता पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड यशस्वी करण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, भ्रष्टाचाराबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.












