विठ्ठल नामाच्या गजरासह दिला वृक्षारोपणाचा संदेश!#पंकज बालसंस्कार केंद्रात ‘भव्य वृक्ष दिंडी’ सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी)
आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित ‘पंकज बालसंस्कार केंद्रात’ अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात भव्य ‘वृक्ष दिंडी सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल नामाचा गजर आणि पर्यावरणाचा संदेश देणारा हा सोहळा परिसरातील नागरिकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला.
पालखी पूजन व दिंडीची सुरुवात
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादासाहेब डॉ. सुरेश पंडित बोरोले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे आणि पवित्र पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. या मंगलमय सुरुवातीनंतर टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली.
बालगोपाळांचे मनमोहक रूप आणि भक्तीमय वातावरण
या दिंडी सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लहानग्या विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह. केंद्रातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, विठ्ठल-रुक्मिणी आणि विविध संत-महात्म्यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती. हातात भगव्या पताका, कपाळावर बुक्का आणि गळ्यात टाळ घेऊन वारकऱ्यांच्या रूपात अवतरलेल्या या बालगोपाळांनी सर्वांची मने जिंकून घेतली. कॉलनी परिसरातून काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये अभंग गायन, हरिपाठ आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
वृक्षारोपणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
यावेळी विभाग प्रमुख सौ. मीना माळी यांनी उपस्थित वारकरी व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगितले. आषाढी एकादशीच्या भक्तीसोबतच सामाजिक भान जपण्यासाठी या दिंडीला ‘वृक्ष दिंडी’चे स्वरूप देण्यात आले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. एम. व्ही. पाटील यांनी उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. “प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे,” असे आवाहन करत त्यांनी सर्वांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित केले.
या शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक सोहळ्याला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. हा प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज बालसंस्कार केंद्रातील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे परिश्रम घेतले. भक्ती आणि सामाजिक कार्याचा सुरेख संगम साधणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून मनस्वी कौतुक होत आहे.












