धक्कादायक! चोपडा तालुक्यातील वडती येथे बापाने १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या, ११ वर्षांचा भाऊ गंभीर जखमी
चोपडा (महाराष्ट्र ९ न्यूज नेटवर्क):
चोपडा तालुक्यातील वडती येथे एका अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणाऱ्या घटनेत १३ वर्षीय बालिकेची डोक्यावर बापाने कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाण्याच्या टाकीसमोरील एका झोपडीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा सुभाष भिलाला (वय १३ वर्ष) हिची डोक्यावर गंभीर वार करून हत्या करण्यात आली, तर तिचा भाऊ रामू सुभाष भिलाला (वय ११ वर्ष) याच्यावरही डोक्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात रामू गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष गोपाल भिलाला (वय ५५) याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
या हत्येमागील नक्की कारण काय आहे, हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान, संशयित आरोपी हा काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करत आहेत












