मातृभाषा आणि शिक्षण
‘भाषा’ म्हणजे प्रकटीकरणाचे सर्वोत्तम माध्यम होय. मनातील भावना, विचार, मते व्यक्त करण्यासाठी मानव भाषेचा वापर करतो. तो आपल्या आयुष्यात विविध भाषा शिकतो, त्या भाषा तो श्रवण, भाषण, वाचन व लेखन करून समृद्ध करत असतो. पण जन्मतः त्याला जी भाषा मिळते अर्थात ऐकू येते ती म्हणजे त्याच्या कुटुंबातील व परिसरातील लोकांची बोलीभाषा, जी त्या बालकाची मातृभाषा म्हणून ओळखली जाते. ते बालक नित्य श्रवणातून ती भाषा जाणून घेते. शारीरिक व बौद्धिक विकास झाल्यावर ते बालक ती भाषा इतरांचे अनुकरण करून बोलण्याचा प्रयत्न करते. पुढे हळूहळू बालकाची परस्परआंतरक्रिया करण्याची क्षमता भाषेच्या माध्यमातून वाढते. त्यासोबतच मोठ्यांनी केलेल्या कौतुकामुळे बालक कठीण शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे हळूहळू बालकाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याइतकी भाषा बालक कळत-नकळत शिकते. पूर्वप्राथमिक शाळेतही(बालवाडी) बालक बडबडगीते, प्रार्थना, नातेसंबंध इत्यादी गोष्टी मातृभाषेतूनच शिकते. व पुढे पहिल्या वर्गापासून बालकाचे औपचारिक शिक्षण सुरू होते. व तेच बालक बोलीभाषेला प्रमाणभाषेचा एका नव्या रूपात शकते.

थोडक्यात सांगायचे झाले तर बालक मातृभाषेच्या वातावरणात घडत असते. व त्याची वैचारिक शक्तीसुद्धा मातृभाषेचा आधार घेऊन विकसित झालेली असते. प्राथमिक वर्गात मुलभूत संकल्पना व संबोध बालक जितक्या सखोल व स्पष्टपणे मातृभाषेतून जाणून घेऊ शकते ते निश्चितच इतर भाषेपेक्षा उत्तमच! बालकांनी गणित व शास्त्र हे विषय मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषेत शिकावे, असा पालकांचा आग्रह असतो. काहीवेळा पूर्णतः शिक्षणाचे माध्यम मातृभाषा नसावे, असे पालक म्हणतात. कारण उच्च शिक्षण जागतिक भाषेत उपलब्ध आहे व तेव्हा ते बालक ती भाषा सुपरिचित झाल्यामुळे उच्चशिक्षण सहज येऊ शकते. काही अंशी ही गोष्ट खरी आहे. पण इमारतीचा पाया तयार होण्याआधीच आपण वरील मजल्याची तयारी करणे योग्य आहे का? याआधी शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनिअर्स घडले नाहीत का? का आपण बालकाच्या छोट्याशा मेंदूला संकल्पना-संबोध समजण्याऐवजी इतर भाषेतील पर्यायी शब्द तोंडपाठ करून त्या संकल्पना व संबोधन यांची एक साचेबद्ध व मर्यादित अशी स्पष्टता प्राप्त करण्यासाठी आग्रही असतो? त्यावरही काही मते अशी असतात की स्पर्धा आहे… मातृभाषेला आम्ही हद्दपार केलेले नाही.. वगैरे वगैरे… पण घरातील वातावरण शिक्षणाच्या माध्यमाच्या भाषेसाठी पोषक आहे का? शिक्षक पुरेसे प्रशिक्षित व अनुभवी आहेत का? ही चिकित्सा बोटावर मोजण्याइतके पालकच करतात.
इतर भाषा नसाव्यात असा दुराग्रह नाही, त्या असाव्यात पण भाषा म्हणून शिक्षणाचे माध्यम म्हणून नव्हे. बालकाचा शब्दसंग्रह जेवढा असतो तेवढी त्याची विचार करण्याची कुवत असते. शब्दच माहीत नसतील तर बालक विचार करणार कसा? त्याच्या ठायी असलेल्या सर्जनशीलतेला वाव कसा मिळणार? बालकाने पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विचार करावा, त्यासाठी मातृभाषेपेक्षा प्रभावी माध्यम कोणतेच नाही. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीच्या युगात बालकाने स्वतः कृतीच्यामाध्यमातून शिकणे अपेक्षित असते व शिक्षकाने मार्गदर्शकाचे काम करावे. अशावेळी शिक्षक व बालक यांनी मातृभाषेचा आधार घेणेच योग्य.

प्रस्तुत लेखाचा सार म्हणजे अमूर्त संकल्पना समजून घेण्यासाठी मातृभाषा हेच शिक्षणाचे योग्य माध्यम आहे. नाहीतर कदाचित आपण भविष्यातील शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, साहित्यिक इत्यादींच्या निर्मितीवर गदा तर आणत नाही ना? बालकाचे विचार आपण त्याच्या परकीय भाषाज्ञानाच्या कक्षेतच सीमित तर करत नाही ना?
जितेंद्र नरेश जोशी, चोपडा. जि. जळगाव.
९८२३३६३४२८
jjoshi060@gmail.com












