खेडीभोकरी-भोकर पुलाचे काम केव्हा मार्गी लावणार… प्रवाशांचे होत आहेत अतोनात हाल

खेडीभोकरी-भोकर पुलाचे काम केव्हा मार्गी लावणार… प्रवाशांचे होत आहेत अतोनात हाल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा व जळगाव तालुक्यांतील तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या खेडीभोकरी (ता.चोपडा) व भोकर (ता. जळगाव) यादरम्यान तापी नदीवर पूल उभारण्यास शासनाने मागील वर्षी मंजुरी दिली आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांसह वाहतुकीसंबंधी लाभ मिळू शकतो. पण पुलाचे काम सुरू झालेले नाही. काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. हा पूल जळगाव व चोपड्यातील तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे.


सध्या लग्न – साखरपुड्याचे दिवस असल्याने व नदी पात्रात पाणी असल्याने एका थडीवरून दुसऱ्या थडीकडे जाण्यासाठी नाव ( होडी ) शिवाय पर्याय नाहीये. सदर नदी पात्रात तब्बल चार होड्या उपलब्ध असूनही मोटार सायकलसह प्रवाशांची भली मोठी रांग पहावयास मिळत आहे. तरी शासनाने त्वरीत पुल बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे.


केळी लागवडीत या प्रस्तावित पुलानजीकचा भाग प्रसिद्ध आहे. १५२ कोटी रुपये निधी या कामासाठी मंजूर केला होता. जळगाव तालुक्यातील भोकर, गाढोदे, रामेश्‍वर, किनोद, सावखेडा, भादली खुर्द, कठोरा आदी गावांमधील मंडळीला चोपडा येथे जाण्यासाठी तब्बल ७० ते ७५ किलोमीटर अंतराच फेरा पार करून जावे लागते. जानेवारीत तापी नदीत एक अस्थायी पूल भोकर व खेडीभोकरी यादरम्यान तयार केला जातो. यामुळे हा फेरा कमी होऊन फक्त १७ किलोमीटर अंतर पार करावे लागनार आहे. अशीच अवस्था चोपड्यातील गोरगावले, खेडीभोकरी, सनपुले, धनवाडी, माचले, कोळंबा, कठोरा आदी चोपडा तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थ, शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. यामुळे खेडीभोकरी ते भोकर यादरम्यान तापी नदीवर पुलाची मागणी गेले २० ते २५ वर्षे केली जात आहे या पुलासाठी मंत्रालयात तीन उच्चस्तरीय बैठका झाल्या. यात जलसंपदामंत्री जयंत पाटील व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत चर्चा केली. एका बैठकीत पुलास तत्त्वतः मंजुरी मिळाली होती. अखेरच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाली होती. १५२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

हा पूल उंच असणार आहे. ६०० मीटरचा हा पूल असेल. दोन्ही बाजूला सुमारे ६५० मीटरचे रुंद रस्ते असतील. दोन्ही बाजूंना भराव टाकला जाईल. ते टिकविण्यासाठी बॉक्स रिटर्नची कार्यवाही बांधकामात केली जाईल. स्टील रोलिंग रोडसाइड फर्निचरचा उपयोग केला जाईल. आधुनिक स्वरूपाचा हा पूल असणार आहे. खेडी भोकरी – भोकर पूल शेतीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याला मंजुरी मिळाली, पण काम सुरू केव्हा होईल, असा प्रश्‍न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More