बारामती ॲग्रो ने पहिली उचल २५०० रुपये द्यावी यासाठी चोपडा साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन…

बारामती ॲग्रो ने पहिली उचल २५०० रुपये द्यावी यासाठी चोपडा साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


बारामती ॲग्रो युनिट ४ चा गळीत हंगाम सुरू होऊन आज २० दिवस झाले मात्र अजूनही ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. त्यामुळं तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी ऊसाचा दर निश्चित केलेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला ३५०० रुपये , गुजरातमध्ये ऊसाला ४५०० रुपये दर मिळत असताना खान्देशातील ऊसाला बारामती अॅग्रो युनिट ४ ने गेले हंगामात २०३१ रुपये दिला होता तर मुक्ताई शुगर ने १८०० रुपये दर दिला होता मात्र या वर्षी बारामती अॅग्रो ने गळीत हंगाम सुरू झाला नंतर अजून ही ऊसाचा दर जाहीर केलेला नाही.ऊसाला एफ आर पी प्रमाणे पहिली उचल २५०० रुपये मिळावी यासाठी शेतकरी संघटनेने चोपडा साखर कारखान्याच्या काट्यावर ठिय्या आंदोलन केले.


शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काट्या जवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला त्यामुळं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . तदनंतर पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी काट्याजवळ आंदोलन करण्यास परवानगी दिली. उसाची पहिली उचल २५०० रुपये मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह व मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी धरली मात्र बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे अनुपस्थित असल्यामुळे यावर तोडगा निघू शकला नाही . बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी भ्रमणध्वनी वरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधून आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला यावर मार्ग काढून सांगतो अशा प्रकारे आश्वासित केले त्यामुळे आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला .


जर मात्र बारामती ॲग्रो युनिट ४ ने २५०० रुपयांची पहिली उचल दिली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेमार्फत देण्यात आला आहे .
ऊसाचा रिकव्हरी रेट शेतकऱ्यांना माहीत नाही , कारखाना शेतकऱ्यांच्या जीवावर चालतो पण कारखान्यात शेतकऱ्यांना प्रवेश नाही हे खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. सर्वांचेच कमिशन वाढले पण शेतकऱ्यांच्या भावात अजिबात बदल नाही याबाबत कारखाना प्रशासनाची उदासीनता दिसून येते.


सदर आंदोलनासाठी तालुक्यातील शेतकरी , शेतकरी संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते याशिवाय महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता आणि परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस फौज फाटा ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र नेते संदीप पाटील , जिल्हाध्यक्ष संजय महाजन , जिल्हा उपाध्यक्ष किरण गुजर, तालुका अध्यक्ष सचिन शिंपी , विनोद धनगर , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More