चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीची अफवा; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ, दुकाने राहिली बंद
महाराष्ट्र9 न्युज नेटवर्क चोपडा
चोपडा शहरात आज अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी येत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेमुळे शहरातील होलसेल किराणा आणि गुटका विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून, अनेक व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र, ही केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात दुपारी अचानक अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली दुकाने तातडीने बंद केली. या प्रकारामुळे शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृत सचदेव यांच्याशी संपर्क साधला असता ही फक्त अफवा असल्याचे सांगण्यात आले.
व्यापारी महामंडळाचे आवाहन
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृत सचदेव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सचदेव म्हणाले की, “कोणतेही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चोपड्यात आलेले नाहीत. हा मेसेज व्यापाऱ्यांनी स्वतःहून दक्ष राहावे, यासाठी प्रसारित करण्यात आला होता. कुणीही घाबरून न जाता आपली दुकाने सुरळीत चालू ठेवावीत.”
भेसळयुक्त मालाबाबत इशारा
व्यापारी महामंडळाने स्पष्ट केले आहे की, हा मेसेज केवळ व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात भेसळयुक्त वस्तूंची विक्री करू नये आणि आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, यासाठी जनजागृती म्हणून देण्यात आला होता. चोपड्यात कोणतीही अधिकृत कारवाई किंवा पथक आलेले नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपला व्यवसाय सुरू ठेवावा, अशी विनंती व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आली आहे.













