तापीकाठी अवैध वाळूचा ‘महाघोटाळा’; कारवाईनंतरही महसूलच्या तहसीलदारांवर मेहेरबानी का?
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क अंमळनेर/चोपडा:
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अंमळनेर आणि चोपडा महसूल विभागाने अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करत मोठी दंडवसुली केली असली, तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या ‘अदृश्य शक्तीं’बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महसूलची कारवाई आणि दंडाचा धडाका
महसूल विभागाने नुकत्याच केलेल्या एका विशेष मोहिमेत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. यामध्ये डंपर, जेसीबी आणि पोकलेनसह बोटी जप्त करण्यात आल्या.अंमळनेर: वाळू माफियावर तब्बल २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
चोपडा: निमगव्हाण येथे १७०० ब्रास वाळू साठा आढळल्याने संबंधित ठेकेदाराला ४ कोटी ९३ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस अन् ‘बळीचा बकरा’ कोण?
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी महोदयांनी अंमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, या कारवाईनंतर अंमळनेरमध्ये केवळ मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे, “तहसीलदार सुराणा यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे?” असा सवाल आता अंमळनेर तालुक्यात उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, चोपडा तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू साठा सापडूनही, जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जनक्षोभ वाढत आहे.
जनतेचा संतप्त सवाल: “अदृश्य शक्ती कोणाची?”
नागरिकांचा असा थेट प्रश्न आहे की, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय एवढे मोठे रॅकेट चालवणे शक्य आहे का? “दोन्ही ठिकाणच्या तहसीलदारांना वाचवण्यासाठी नेमकी कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे?” असा प्रश्न आता तालुकावासीयांना पडला आहे.
अवैध वाळू उपशाचे हे रॅकेट प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच सुरू होते का, अशी चर्चा आता सर्वस्तरातून होत असून, दोषींवर केवळ दंड करून सोडून न देता कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.












