शिकणं आणि जगणं यांचा समन्वय म्हणजे शिक्षक: मा भाऊसाहेब चासकर
चोपडा (प्रतिनिधी): सचिन जायसवाल

21व्या शतकात समाज परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाचा उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टिकोण, वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याचे काम शिक्षक करतात. म्हणून शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे. काळानुरूप विद्यार्थ्यांच्या क्षमता व अभ्यासक्रम यांची सांगड घालण्यासाठी शिक्षकाने अध्यापनात वैविध्यता आणली पाहिजे. सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2005 प्रमाणे विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी प्रत्येक शिक्षकांची कृती, संवाद, वाचन ,वर्तन अनुरूप असणे गरजेचे आहे. जबाबदार नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे; यासाठी शिक्षक या नात्याने शिक्षण आणि जगणं यांचा समन्वय साधला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी प्रताप विद्या मंदिरात केले.
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या 102 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘ करूया सृजनांचे बीजारोपण’ या पालक व शिक्षक यांच्यासाठी आयोजित मुक्तसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने झाली. आपल्या प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून देताना संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, संशोधन, शिक्षकांच्या क्षमतांची बांधणी, तंत्रज्ञानाचा वापर करणारे नवनिर्मितीचे शिलेदार म्हणून भाऊसाहेब चासकर यांच्या भरीव कामगिरी चा परिचय यावेळी करून दिला.
यावेळी मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले. व्यासपीठावर चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही सी गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरीताई मयूर, प्रा प्रवीण सप्तर्षी, डॉ रमाताई सप्तर्षी, कार्यकारिणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी,संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, प्रथितयश डॉ विकास हरताळकर, प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक आदी उपस्थित होते.
शालेय वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या गावातील विभागाने महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत ‘ स्वच्छ भारत- सुंदर भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख वक्ते भाऊसाहेब चासकर यांनी शिक्षक व पालकांशी मुक्त संवादाद्वारे बदलत्या काळाची हाक समजून घेऊन स्वतःचे सामर्थ्य सिद्ध न करता सामर्थ्यवान विद्यार्थी घडवावेत. अपेक्षित प्रश्नांची तयारी करताना जीवनात येणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरे शोधण्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. वाचन करून मन समृद्ध केली पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञान हे जेवढे उपकारक आहे तेवढेच अपायकारक देखील आहे म्हणून योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. नियोजित अभ्यासक्रमा सोबत समाजमनाचे भान निर्माण करणारा मानवी दृष्टिकोन शिक्षकाने अवलंबावा. तसेच आजच्या 21 व्या शतकात विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक मूल्यांक न वाढवता त्याचा बोधात्मक आणि मूल्यात्मक विकास देखील करावा असे आवाहन त्यांनी शिक्षक व पालकांना केले.
कार्यक्रमाचे ईशस्तवन पी ए नागपुरे,पी बी कोळी,डी एम वैद्य यांच्या गानवृंदाने सादर केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एफ माळी यांनी केले. मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी प्रताप विद्या मंदिराचे उपमुख्याध्यापक डि के महाजन, नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए ए ढबू,उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक जी वाय वाणी, आर आर शिंदे,वाय एच चौधरी,सर्व विद्याशाखांचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












