कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका,
‘ऍग्रिकॉस’ मित्र दाम्पत्य धावले मदतीला

चोपडा (प्रतिनिधी) : सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. नाशिक, निफाड, पिंपळगाव बसवंत आदी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. निर्यातक्षम, उच्च गुणवत्तेच्या द्राक्षांनाही यावेळी अपेक्षित भाव व मागणी नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. पडून असलेला द्राक्षांचा माल जागीच खराब होत असल्याची परिस्थिती ती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याचे दुःख दुसरा शेतकरी (ॲग्रीकॉस) व्यक्तीच समजू शकतो व मदतीला येऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण नुकतेच दिसून आले.
लॉकडाऊनमुळे एकीकडे शेतकरी मालक विकू शकत नाही तर दुसरीकडे मित्र पूर्णवेळ घरातच बसून आहेत.अशावेळी शिरपूर येथील राहुल पाटील सत्यविजय व त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभा पाटील यांनी एक युक्ती शोधून काढली. शिरपूर शहर व परिसरातील आपल्या सर्व नातेवाईक, मित्र परिवाराच्या मदतीने सर्व समाजमाध्यमांवर उच्च प्रतीच्या द्राक्षांच्या मागणी (ऑर्डर) नोंदवण्यासाठी आवाहन केले.बाजारभावात उच्च प्रतीचे द्राक्ष उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी 12 क्विंटल द्राक्षांची नोंदणी त्यांना मिळाली.
तत्काळ त्यांनी आपल्या शेतकरी मित्राकडून द्राक्षांचे बंदिस्त खोके मागवून घेतले व शिरपूर परिसरात केवळ तीन तासात सोशल डिस्टन्सिंग चे सर्व नियम पाळून या द्राक्षांची विक्री केली. यातून द्राक्ष उत्पादक शेतकरी व राहुल पाटील यांना आर्थिक फायदा तर मिळालाच पण ग्राहकांनाही उत्तम प्रतीचे द्राक्ष थेट घरपोच मिळाल्याने तेही आनंदित होते.त्यांना लगेचच 8 क्विंटल द्राक्षाची दुसरी ऑर्डरही लगेच मिळाली आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीचा प्रत्यय या उदाहरणातून आला.
लॉकडाऊन काळात केवळ घरात बसून न राहता योग्य खबरदारी बाळगून आपण व्यवसाय वाढवू शकतो याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.












