आदिवासी मुलींची सुरक्षा रामभरोसे
देवझिरी आश्रमशाळेत मुलींच्या वस्तीगृहात अधीक्षकांचा दारू पिऊन अनधिकृत प्रवेश… मुलींच्या वस्त्रांसोबत खेळत धिंगाणा… मुलींमध्ये भीतीचे वातावरण… कारवाईची मागणी…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी):-
चोपडा तालुक्यांतील अति दुर्गम भागातील सातपुड्यातील देवझिरी आश्रम शाळेत दि.५ फेब्रुवारी रोजी मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक सचिन अशोक गडे हे रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत तल्लीन होऊन मुलींच्या वस्तीगृहात त्यांनी अनधिकृत प्रवेश करून जेथे मुली कपडे बदली करत असताना त्याच ठिकाणी त्यांच्या जवळ पोहोचले व मुलींना दहा मिनिटांसाठी माझ्यासोबत चला असे लज्जास्पद शब्द बोलू लागले… त्याच वेळी बाथरूम मधून एक मुलगी आपले कपडे हातात घेऊन येत असताना अधिक्षक सचिन गडे हे त्या मुलीच्या दिशेने पुढे पुढे सरकत होते व ती मुलगी मागे मागे जात होती हे पाहून तेथील सर्व मुली घाबरल्या व तेथून अधीक्षक गडे यांना बाहेर निघण्यास विनंती करू लागल्या तरी देखील अधीक्षक गडे तेथून जाण्यास तयार नव्हते अशी माहिती मुलींनी महाराष्ट्र9 न्यूजला दिली आहे .

सदर कृत्याने सर्व मुली घाबरल्या व आपण असुरक्षित आहोत हया भीतीने त्यांनी रात्र कशीबशी काढली व दुसऱ्या दिवशी अधीक्षिका अर्चना कोळी हया शाळेत आल्यावर त्यांनी रात्री घडलेला प्रसंग कथन केला तेव्हा मात्र मुलींच्या वस्तीगृहाच्या अधिक्षिका अर्चना कोळी यांची पायाखालची वाळू सरकली . लगेच त्यांनी व मुलींनी लेखी तक्रार शाळेचे मुख्याध्यापक अविनाश साळुंखे यांच्याकडे केली.त्यांनी सदर लेखी तक्रार अर्ज वनिता सोनवणे ( प्रकल्प अधिकारी, यावल ) यांच्याकडे पाठविला.
सदर घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून प्रशांत माहुरे ( सहा.प्रकल्प अधिकारी, यावल ) व सौ सुलताने ( कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, यावल ) यांनी चौकशी करून अहवाल शाळेला दिला असल्याचे समजते.

मुलींनी शाळेचा मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार दिली आहे तरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर घटने बाबत गुन्हा का नोंदविला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदर शाळेत टीचींग स्टाफ ६ व नॉन टीचिंग स्टाफ १२ असा एकूण १८ लोकांचा स्टाफ आहे तरी पत्रकारांनी शाळेला भेट दिली असता फक्त दोनच कर्मचारी शाळेत उपस्थित आढळून आले. शाळेतील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कोणीच नियमित व वेळेवर येत नाहीत. स्वतः मुख्याध्यापक हे जळगाव येथून अप डाऊन करतात. शाळेत थंब मशीन नाही. मुलींच्या वस्तीगृहाच्या परीसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. या व्यतिरिक्त बऱ्याच समस्या असल्याचे सांगितले.

मुलींच्या वस्तीगृहात अनधिकृत प्रवेश करून धिंगाणा घालणारा अधिक्षक सचिन गडे हे ६ फेब्रुवारी पासून शाळेत येत नाहीत. त्यांनी रजेचा अर्ज दिला नाही तसेच वस्तीगृह अधीक्षकाचा चार्ज दुसऱ्याला दिला नाही असे तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले. अशा प्रकारच्या गोष्टी घडत असताना मुख्याध्यापक का कारवाई करत नाही हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

यावल प्रकल्प विभाग येथील आलेल्या अधिकाऱ्यांना आदिवासी संघटना तर्फे निवेदन देखील देण्यात आले की, अशा निर्लज्ज अधीक्षकावर जर यावल प्रकल्पातर्फे काही ॲक्शन घेतली नाही तर चोपडा येथे सारे आदिवासी बांधव रस्ता रोको आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करतील व मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील .
अधिकाऱ्यांना या घटने विषयी विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की, येत्या दोन दिवसात नाशिक कार्यालयातर्फे योग्य ती कारवाई होईल.
व तेथील नागरिक व आदिवासी संघटना व आश्रम शाळेच्या मुली यांनी अधीक्षक सचिन गडे यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी प्रकल्प अधिकाऱ्यांजवळ केली आहे.
यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता व सदर कारवाईचा अहवालाची मागणी केली असता सदर कारवाईचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल ( प्रस्ताव )अप्पर आयुक्त यांच्याकडे पाठविला असल्याचे सांगितले. सदर बाबीची चौकशी सध्या सूरू आहे व प्रोसेस मध्ये असल्याने अहवालाची प्रत ए सी पी कार्यालयाला विचारून देता येते की नाही ते सांगते असे सांगितले.
निर्लज्ज व दोषी अधिक्षक यांच्यावर कारवाई करून मुलींना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी आदिवासी संघटना तर्फे करण्यात आली आहे…..












