अडावद ता. चोपडा येथे शेत मजुराचा झाला खून : श्वान पथक घटनास्थळी दाखल : मार्ग काढण्यात अपयशी
प्रतिनिधी अडावद ता. चोपडा
येथील पाटचारीवरील रहिवासी जगदीश फिंगऱ्या बारेला (४०) याचा बेदम मारहाण करून खून करण्यात आला. खूनामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. श्वानपथक आले. मात्र कोणताही माग काढण्यात ते अपयशी ठरले आहे. यामुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, १ रोजी पहाटेच अंकलेश्र्वर – बुऱ्हाणपूर महामार्गावर पिर पाखर बाबाच्या दर्ग्याजवळ जगदीश फिंगऱ्या बारेला वय ४० याचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच अडावद पोलिसांनी परिसर पिंजून काढला. नेमके याचे मारेकरी कोण हे शोधण्यासाठी जळगावात येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र जवळपास व दर्ग्याच्या परिसराच्या पलीकडे ते जाऊ शकले नाही. मृतदेहाच्या प्राथमिक स्थितीवरून त्याला झालेला जबर मारहाण करूनच त्याचा खून करण्यात आला असल्याचे समजते. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्वान जंजिरा सोबत ठसे तज्ञ सहायक पोलीस निरीक्षक फड , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनरीक्षक गणेश वाघमारे, अनिल जाधव यांचे पथक श्वान जंजीर सोबत हवालदार निलेश झोपे, पोलीस नाईक प्रशांत कंखरे हे उपस्थित होते.

सदर मयत इसम जगदिश फिंगऱ्या बारेला हा गावाच्या उत्तरेकडील हतनुरच्या उजव्या कालव्यावरील डाव्या चारीवर झोपडीत राहत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होता. संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करीत असे.
घटनेचे गांभीर्य पाहता चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनरीक्षक राजू थोरात, हवालदार भरत नाईक, दिनेश चव्हाण, गृह रक्षक दलाचे जवान संजय पवार, अमोल हिवाळे, चंदू कोळी, मनोज महाजन, किरण महाजन यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृत देहाजवळ एम. पि. ४६ एम.एल. ६८८९ क्रमांकाची दुचाकी लावलेली आढळली. मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पाठविण्यात आला आहे.याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.













