महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले टपाल कार्यालयाचे कामकाज
चोपडा – शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना चार भिंती बाहेरच्या जगाचे ज्ञान मिळावे, समाजाला विविध सेवा पुरविणाऱ्या सेवा संस्थांचा परिचय विद्यार्थ्याना व्हावा, या हेतूने येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी दर शनिवारी प्रत्येकी एक वर्ग आपल्या वर्गशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शासकीय कार्यालयांना भेट देऊन या कार्यालयांची कार्यपद्धती जाणून घेत असतात.


या उपक्रमांतर्गत दि. ५ ऑक्टोबर, शनिवार रोजी विद्यालयातील इ. ८ वी अ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक पी . एस. चव्हाण यांच्या सोबत चोपडा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसला भेट दिली. याप्रसंगी पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ पोस्ट मास्टर मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना इतिहासात नेत पोस्ट खात्याचा प्रवास अगदी सहज विद्यार्थ्यांसमोर मांडला. पोस्ट खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पोस्ट ऑफिसमधील सिध्दार्थ जिरे, गणेश कोळी, चरणसिंग, महेश कुमार, आदित्य सिंग, देवेंद्र पाटील, विशाल पाटील हे सहकारी उपस्थित होते. संबधीत अधिकाऱ्यांनी या भेटी प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्यालयाला भेट देत येथील कामकाज जाणून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर या भेटी दरम्यान आपल्या कार्याच्या माध्यमातून समाजाची अविरतपणे सेवा करणाऱ्या पोस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रती ऋण व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याचा पेन, गुलाबपुष्प देत पेढा भरवून यथोचित सत्कार केला.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक एस. बी. पाटील, पर्यवेक्षक व्ही. डी. पाटील यांचे मार्गदर्शन व राजेश गुजराथी, विजय वा. पाटील यांचे सहकार्य लाभले. पोस्ट ऑफिसची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे जाणवत होता. यापूर्वी विद्यालयातील इ. ९ वी ब च्या वर्गाने वर्गशिक्षक सी. पी. चौधरी यांच्या तर इ. ८ वी ब च्या वर्गाने वर्गशिक्षिका सौ. वाय. पी. ठोके यांच्या नेतृत्वात अनुक्रमे जलशुद्धीकरण केंद्र व शहर पोलिस ठाण्याला भेट देऊन तेथील कार्यपद्धती जाणून घेत आपल्या अनुभवांची कक्षा अधिक रुंदावत आनंद मिळवला. विद्यालयाच्या उपक्रमाचे पालक वर्गातून स्वागत होत आहे.













