मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पंकज विद्यालयास प्रथम पारितोषिक
सामाजिक बांधिलकी जोपासणारे विद्यार्थी घडवा – प्रा. चंद्रकांत सोनवणे
चोपडा – महाराष्ट्र शासन तर्फे शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापन साठी मा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेचे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पंकज विद्यालय चोपडा येथे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पंकज शैक्षणिक संस्था संचालक पंकज बोरोले, गटविकास अधिकारी अनिल विसावे, गट शिक्षण अधि. कविता सुर्वे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष अविनाश राणे,संचालक गोकुळ भोळे, दिपाली बोरोले सर्व केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व व्यवस्थापन गटातील शाळांना गौरविण्यात आले त्यात पंकज प्राथमिक विद्यालय, चोपडा या शाळेस तालुका स्तरावर प्रथम क्रमांक व 3 लाख रुपये धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मुख्याध्यापक एम व्ही पाटील व शिक्षक वृंद यांना आमदार चंद्रकांत सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते सामूहिक सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील कुरवेल हायस्कूल, नूतन मंदिर अडावद,जि.प शाळा चुंचाळे, जि.प काजीपुरा व जि.प खाऱ्यापाडव, या बक्षीस पात्र शाळांच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच शासनाच्या शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती उपक्रमात यशस्वी शिक्षकांना बक्षीस धनादेश प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांनी विद्यार्थी सुप्त गुणांना प्राधान्य दिले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावे.देश सक्षम होण्यासाठी शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदर्श व पवित्र कार्य करु शकतात. सर्व शाळा सुंदरच असतात मात्र समाजाचा दृष्टिकोन त्याबाबत सकारात्मक असावा. मोबाईलचा वापर विकासासाठी करावा विकार होणारं नाही याची काळजी घ्यावी.सर्वांनी मुलांना व कुटुंबाला वेळ द्यावा त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकेल व समाज घडविण्यास मदत होईल., विद्यालयाच्या सांघिक यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले व संचालक मंडळाने सर्वांचे अभिनंदन केले. शालेय गुणवत्तेत सातत्य टिकवून ठेवण्याची प्रेरणा दिली.

कार्यक्रम सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.नियोजन व यशस्वितेसाठी शिक्षण विभाग पंचायत समिती चोपडा कर्मचारी पंकज विद्यालय सर्व शिक्षक वृंद , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. समारंभास तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व पंकज शैक्षणिक संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यालयात शेवटी सर्वांनी ट्रॉफी प्रमाणपत्र सोबत छायाचित्रे घेऊन आनंदोत्सव साजरा केला.













