कस्तुरबा प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांना एक्सपायरी औषध?
पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा गदारोळ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चोपडा (दि. 20 ऑगस्ट) – चोपडा शहरातील कस्तुरबा प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांना मुदतबाह्य (एक्सपायरी) औषध दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत गदारोळ घालत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या गदारोळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाची झोप उडाली आहे.

सदर शिबिरात डॉ. धनवंत पाटील व त्यांचे सहकारी यांनी तीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी केली. यामध्ये नयन दयानेश्वर भोई या विद्यार्थ्याला उलटी व संडाशीची तक्रार असल्याने त्याला ओंडेम सेंट्रल नावाचे औषध देण्यात आले. मात्र घरी गेल्यावर विद्यार्थ्याच्या पालकांनी तपासणी केली असता हे औषध एप्रिल 2025 मध्येच एक्सपायर झालेले असल्याचे उघड झाले.

यानंतर संतप्त पालक दयानेश्वर भोई यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह शाळेत धाव घेतली. या वेळी चौकशीदरम्यान शाळेतील लिपिक राहुल साळुंखे यांनी, “तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही कोणाला घाबरत नाही; औषध डॉक्टरांनी दिले आहे” असे वक्तव्य करून अधिकच खळबळ माजवली. पुढील विचारणीत संबंधित डॉक्टरांनी जबाबदारी झटकून मदतनीस महिला कर्मचाऱ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र नंतर ही औषध वितरणातील चूक असल्याचे मान्य करत त्यांनी माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
या गंभीर घटनेवर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सोमवारी सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान संतप्त पालकांनी प्रश्न उपस्थित केला की, “उपजिल्हा रुग्णालयात अजून किती एक्सपायरी औषधे पडून आहेत? एक्सपायरी औषधामुळे एखाद्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर जबाबदार कोण?.

या प्रकरणामुळे पालक वर्गात प्रचंड संताप असून, आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.












