चोपडा तालुक्यात अवैध वृक्षतोड : सातपुडा पर्वतात १५० पेक्षा जास्त सागवान झाडांची कत्तल?

चोपडा तालुक्यात अवैध वृक्षतोड : सातपुडा पर्वतात १५० पेक्षा जास्त सागवान झाडांची कत्तल?

चोपडा (प्रतिनिधी) :
सातपुडा पर्वताच्या मनमोहक हिरवाईला काही माफिया ‘पुष्पा स्टाईल’ ने उद्ध्वस्त करत असल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. चोपडा तालुक्यातील उमरटी अंतर्गत गोऱ्यापाडा गाव परिसरात तब्बल १५० हून अधिक सागवान वृक्षांची अवैध कत्तल झाल्याचा गंभीर आरोप संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पावरा यांनी केला आहे.


३१ ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० वाजता भरदिवसा ट्रॅक्टरमध्ये सागवानी दांड्यांची वाहतूक उघडपणे सुरू होती, असा थरारक प्रकार पावरा यांनी माध्यमांसमोर मांडला. यामध्ये स्थानिक वनरक्षकांचा आशीर्वाद असल्याचा दावा करत त्यांनी जिओ-टॅग फोटो व व्हिडिओ पुरावे सादर केले.


पावरा यांनी तक्रार देण्यासाठी थेट वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. थोरात यांची भेट घेतली असता, “मी कोण आहे हे तुला माहीत आहे, पद सोडेन पण तुला दाखवतोच” अशा स्वरूपाची धमकी थोरात यांनी दिल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. त्याचा व्हिडिओदेखील माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.


वन विभागाकडून या प्रकरणावर मात्र संपूर्ण सत्य गुप्त ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. थोरात यांच्यानुसार फक्त २१ वृक्षतोड झाली असल्याचे सांगितले जात आहे, तर प्रशांत सोनवणे यांचे म्हणणे आहे की, २७ झाडांची कत्तल झाली आहे. यामुळे नेमका आकडा गुलदस्त्यात गेला असून स्थानिकांच्या शंका अधिकच गडद झाल्या आहेत.


या घडामोडींमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून “सातपुडा संपत आहे, ते ही वनविभागाच्या आशीर्वादाने” असा सूर ग्रामस्थांतून उमटत आहे. पावरा यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ निलंबनाची मागणी केली आहे.
आता या प्रकरणी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र सातपुड्याच्या हिरवाईला गंडांतर आणणाऱ्या या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More