चोपडा- बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरतावादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या करणे, हिंदूंची घरे, दुकाने जाळणे पुन्हा चालू केले आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदूविरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध करत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांना कारवाई करण्यासाठीचे निवेदन यांना सादर केले. यात सततचे हिंदूविरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालावेत. तसेच बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्यावर ढाका येथे गोळीबार झाला. त्यांच्या मृत्यूनंतर हिंदू समाजाविरुद्ध सुनियोजित हिंसाचार सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी हिंदूंची घरे व मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. याचे प्रत्यक्ष व्हिडिओ, साक्षी व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांतून उघड झालेले सत्य आहे. तरीही बांगलादेश सरकार कारवाईत टाळाटाळ करत आहे. जनगणनेनुसार १९४१ मध्ये २८% असलेली हिंदू लोकसंख्या आता फक्त ७-८% पर्यंत घसरली आहे. ही शांतपणे चाललेली हिंदू समाज निर्मूलन प्रक्रिया आहे.

निवेदनात भारत-बांगलादेश कराराद्वारे अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, संयुक्त राष्ट्र व मानवाधिकार आयोगावर मुद्दा उपस्थित करून फॅक्ट-फाइंडिंग मिशनची मागणी, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व व पुनर्वास धोरण, मंदिरे व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण, बांगलादेशातील हिंदू समाजाशी थेट संवाद यंत्रणा उभारण्यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील सर्वांत मोठा हिंदूबहुल देश असल्याने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर व आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर मनसे नेते अनिल वानखेडे, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, शरद पाटील, नरेंद्र पाटील, शामसिंग परदेशी, यशवंत चौधरी, पत्रकार संदिप ओली, दिपक महाजन, प्रेम घोगरे, प्रविण जैन, विशाल भोई, करण राजपूत, सुधाकर चौधरी, किशोर दुसाने आदींसह इतरांच्या स्वाक्षरी आहेत.












