दोन पोलिसांत सिनेस्टाईल हाणामारी; दोघे गंभीर जखमी

चोपडा | प्रतिनिधी.

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या सिनेस्टाईल हाणामारीने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोघेही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्वतंत्र रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघे मागील चार ते पाच वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातच पूर्वीपासूनचे वैमनस्य असल्याचेही समजते.

घटनेपूर्वी दोघांमध्ये भ्रमणध्वनीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. “तू कुठे आहेस, आत्ताच येतो, तुझा हिशोब बघतो,” अशा स्वरूपाचे संभाषण झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात दोघांची भेट झाली आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.

या मारामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहेत.

या संदर्भात चोपडा येथील डीवायएसपी घोलप यांनी दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद आणि पूर्व वैमनस्य असल्याचे सांगितले.

*खाकी वर्दीला काळिमा*

कायद्याचे रक्षण करणारे आणि समाजाला शिस्तीचा संदेश देणारे पोलीस कर्मचारीच जर रस्त्यावर एकमेकांवर हात उगारत असतील, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना केवळ दोन व्यक्तींमधील वाद नसून संपूर्ण पोलीस दलाच्या शिस्त, प्रतिमा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस खात्याने अंतर्गत शिस्त आणि जबाबदारी याबाबत अधिक कडक भूमिका घेणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More