चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या सिनेस्टाईल हाणामारीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघे मागील चार ते पाच वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.घटनेपूर्वी दोघांमध्ये भ्रमणध्वनीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. “तू कुठे आहेस, आत्ताच येतो, तुझा हिशोब बघतो,” अशा स्वरूपाचे संभाषण झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात दोघांची भेट झाली आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.
या मारामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहेत. ह्या प्रकरणी दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता कलम १९४(२)प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक महेश टाक यांनी प्रसार माध्यमांना दिली. एका महिन्याचा आत चोपडा तालुक्यातील लक्ष्मण शिंगाणे (शहर पोलिस ),राकेश पाटील ,शशिकांत पारधी(दोन्ही ग्रामीण पोलिस)तिन्ही हेड कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे सपूर्ण जिल्ह्यात खडबळ उडाली आहे












