चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना दिनांक २५ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार असून या कालावधीत नागरिकांनी थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवर आजपर्यंत आकारण्यात आलेल्या व्याज व दंडावर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.
नगरपरिषदेच्या नोंदीनुसार अनेक निवासी मालमत्ताधारकांकडे मागील काही वर्षांपासून कर व पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित आहे. नागरिकांना आर्थिक सवलत देऊन थकबाकी नियमित करण्यासाठी तसेच नगरपरिषदेच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही विशेष अभय योजना राबविण्यात आली आहे.
चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री रामनिवास झंवर यांनी सांगितले की,“नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी कर व पाणीपट्टीची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना थकबाकी नियमित करण्याची संधी देण्यासाठी २५ मार्च २०२६ पर्यंत व्याज व दंडावर १००% सूट देणारी अभय योजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी एकरकमी भरावी.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की,
“योजनेचा लाभ न घेतल्यास नियमानुसार पुढील काळात थकबाकीदारांवर वसुलीची कडक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तत्काळ नगरपरिषद कार्यालयात किंवा संबंधित विभागात कर भरावा.”*
*नगराध्यक्षांचे आवाहन*
याबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील यांनी सांगितले की,
“चोपडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि थकबाकी कमी करण्यासाठी ही अभय योजना राबविण्यात आली आहे. व्याज व दंडावर १००% सूट ही मोठी संधी असून शहरातील सर्व निवासी मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.”
त्यांनी पुढे नागरिकांना आवाहन करताना म्हटले की,
“आपला कर वेळेत भरून शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवा. २५ मार्च २०२६ पूर्वी एकरकमी कर भरून व्याज व दंडमाफीचा लाभ घ्या आणि चोपडा शहर अधिक स्वच्छ, सुबक व विकसित करण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करा.”
मुख्याधिकारांचे नागरिकांना आवाहन
चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्व निवासी मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येते की, २५ मार्च २०२६ पूर्वी थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर एकरकमी भरून व्याज व दंडावर १००% सूट या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी नागरिकांना केले आहे.












