चोपड्यात सावकारी त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या;आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघे ताब्यात
महाराष्ट्र9न्युज नेटवर्क चोपडा:
बेकायदेशीर सावकारी आणि व्याजाच्या त्रासाला कंटाळून वर्डी (ता. चोपडा) येथील एका ४९ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
घटना काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, वर्डी येथील रहिवासी वाल्मीक जिजाबराव शिंदे (वय ४९) यांनी संशयित आरोपींकडून ₹८,०००/- व्याजाने घेतले होते. आरोपींनी प्रतिदिन ₹१५०/- या सावकारी व्याजाने पैशांची मागणी केली. ही रक्कम वेळेवर दिली नाही म्हणून आरोपींनी वाल्मीक शिंदे यांच्या दुकानाची चाबी हिसकावून घेतली आणि “दुकान परत मिळणार नाही” अशी धमकी देत मारहाण केली.
आरोपींच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून वाल्मीक शिंदे यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास जुना माचला रोडवरील एका शेतात वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. 
सुसाईड नोट सापडली
आत्महत्येपूर्वी वाल्मीक शिंदे यांनी आरोपींच्या त्रासाबद्दल एक सुसाईड नोट लिहून आपल्या खिशात ठेवली होती. यामध्ये आरोपींनी शिवीगाळ, धमकी देऊन व्याजासाठी आत्महत्यूस प्रवृत्त केल्याचे नमूद आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा रोहीत वाल्मीक शिंदे (वय २०) याने चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींवर गुन्हे दाखल
या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११९(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) सह सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींची नावे:
१. राहुल रामकृष्ण माळी (वय २८, रा. महात्मा फुलेनगर, चोपडा) – (ताब्यात)
२. विकास रामदास माळी (वय ३५, रा. महात्मा फुलेनगर, चोपडा) – (ताब्यात)
३. अनिल बारकू माळी (वय ३८, रा. तारामती नगर, चोपडा)
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत.












