चोपडा शहरात हवा प्रदूषण पातळी मोजणी सुरू
“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत नगर परिषदेचा उपक्रम
पर्यावरणाचा समतोल राखणे व प्रदुषणमुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणेकामी राज्यशासनाने “माझी वसुंधरा” हे राज्यव्यापी अभियान सुरु केले आहे. या अभियानात चोपडा नगपरिषद देखील सक्रिय सहभागी आहे. हे अभियान 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत शहरातील प्रदूषणाची पातळी मोजण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख तीन ठिकाणी प्रदूषण पातळी मोजणी करीता मशीन ठेवण्यात आली आहेत. शहरात पहिल्यांदाच अशी चाचणी केली जात आहे.
चोपडा येथे 31 मार्च 2021 पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, जमिनीचे धुपीकरण, वायू प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारणे, जलस्त्रोत संवर्धन, ऊर्जेचा वापरासाठी जनजागृती करण्यात येत आहे. निर्सगाशी संबंधित असलेल्या या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील वायू प्रदूषणाची तपासणी केली जात आहे. त्यासाठी नगरपरिषद आणि पर्यावरण विभागाच्या माध्यमातून निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे.
शहरातील नागरी क्षेत्र (बजरंग नगर/पाटीलगढी), व्यापारी क्षेत्र (छ.शिवाजी महाराज चौक) आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (गट नं.406 रामपुरा) या ठिकाणच्या हवेची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी ॲम्बीएंट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग मशिन वरील नमूद केलेली ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. या मशीनच्या सहाय्याने तीन ते चार किलोमीटर परिसरातील हवेची तपासणी केली जाणार आहे.












