प्रताप विद्या मंदिरात मराठी राजभाषा दिन संपन्न
चोपडा ( प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचालित प्रताप विद्या मंदिरात दि. 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्म दिन ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. तसेच संत शिरोमणी रविदास जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. यानिमित्त कलाशिक्षक श्री. पंकज नागपुरे यांनी मांडलेल्या मराठीतील 48 वर्णाक्षरांच्या कॅलिग्राफीतील प्रतिमांच्या प्रदर्शनाचे कार्यक्रमाचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी. व्ही. याज्ञिक यांनी इतर पदाधिकारी यांच्या समवेत फीत कापून केले. या वेळी मराठी विषय शिक्षक पी. डी. पाटील यांनी प्रास्तविकात या दिनाला मराठी राजभाषा दिन म्हणून कधीपासून साजरा करण्यात येत आहे, तसेच कवी कुसुमाग्रजांना कुसुमाग्रज हे नाव कसे पडले, याचा इतिहास सांगितला. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी , धर्म, पंथ, जात, एक जाणतो मराठी , एवढ्या जगात माय मानतो मराठी” या पंक्तीवरून मराठी भाषेचे महत्त्व त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात कु. आसावरी किशोर महाजन इ. 10 वी च्या विद्यार्थिनीने ‘अनाहूत’ स्वनिर्मित कथा सांगितली. इ. 6 वी चा विद्यार्थी तन्मय बाविस्कर याने श्यामची आई कथेचा प्रसंग, इ. 8 वी ची विद्यार्थिनी प्रिया सचिन चौधरी हिने अफजल खानाच्या वधाचा प्रसंग, इ. 9 वी ची विद्यार्थिनी मृणाल शरद पाटील हिने ‘स्मशानातील सोनं’ या कथेचा प्रसंग, इ. 10 वी ची विद्यार्थिनी राजश्री समाधान धनगर हिने ‘हिरकणीची कथा’ असे नानाविध प्रसंग कथेच्या माध्यमातून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक डी. व्ही. याज्ञिक यांनी आपल्या शाळेतील बाल साहित्यिक, बाल वैज्ञानिक हे आपल्या शाळेचे वैभव आहे. भाषा जीवन समृद्ध करते, ती हृदयापर्यंत पोहचली पाहिजे. एखाद्या भाषेवर प्रेम करणे, म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढवणे होय. मराठी भाषा समृद्ध आहेच ती अधिकाधिक समृद्ध कशी करता येईल, यासाठी प्रत्येकाला योगदान करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पी. बी. कोळी यांनी मराठी गीत गायन केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डी. व्ही. याज्ञिक, उपमुख्याध्यापक आर. आर. शिंदे, पर्यवेक्षक जी. वाय. वाणी, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे. एस. शेलार तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. एफ. माळी, टी. ई. लोहार व सर्व मराठी विषय शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोहार यांनी केले, तर श्री. अकमल सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.












