चोपडा तालुका कठीण परिस्थितीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे वक्तव्य
चोपडा प्रतिनिधी : —-
चोपडा तालुक्याची वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब असून संपूर्ण तालुक्याला कोरोनाने वेढा घातलेला असून तो थांबायला तयार नाही अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत त्याला मुख्य कारण म्हणजे मागील काही महिन्यात चोपडा तालुक्यात मोठमोठी लग्न समारंभ , प्रेतयात्रा इतर कार्यक्रमांमुळे चोपडा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढण्यास कारणीभूत असल्याचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांनी चोपडा येथे वक्तव्य केले .

होमक्वारेनटाईन रुग्णांना प्रशासनातर्फे नेहमी आवाहन करण्यात येते की , किमान आठ ते बारा दिवस घरी स्वतःच्या जबाबदारीने स्वतःची काळजी घ्यावी , जर रुग्ण चार ते आठ दिवसात घराच्या बाहेर पडत असेल तर ते चुकीचे ठरते , त्यामुळे रुग्ण वसंख्या वाढण्यास मदत होत असते तरी लवकरच होमक्वारेनटाईन ही संकल्पना बंद करण्याचा विचार असून शंभर टक्के रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातील व येत्या काही दिवसात चोपडा तालुक्याच्या कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असेल अशी ग्वाही त्यांनी दिली .
येत्या काही दिवसात टेस्टिंग वाढवण्यावर भर आहे तसेच वेळेवर आयडेंटिफाय करण्यावर सुद्धा भर आहे व पेशंट कसा वाचेल यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील , जळगाव जिल्ह्याच्या मृत्यूदर हा 0.5 एवढा असून कमीत कमी पेशंटला व्हेंटिलेटर , ऑक्सिजन देण्याची गरज भासेल तसेच तात्काळ उपचार करण्याच्या संदर्भाच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले .

चोपडा तालुका सध्या कठीण परिस्थितीत असून नागरिकांनी कोरोनाचा नियमांचे पालन करावे , शंभर टक्के मास्क वापरावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले .
साठ वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण तात्काळ करून घ्यावी तसेच नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित टेस्टिंग करून घ्यावी तसेच खाजगी कोविड सेंटरमध्ये महात्मा फुले आरोग्य जन सुविधेचा लाभ मिळण्यासाठी आरोग्यदूताशी चर्चा केली जाईल व लाभार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही असेही त्यांनी दिले .

स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलावीत यासंदर्भात सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे . लग्न , अंतयात्रा यांना आजही गर्दीचे स्वरूप आहेच तरी सदर बाबी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास येत नसाव्यात का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे . होमक्वारेनटाईन रुग्ण तीन ते चार दिवसात स्वतःला निगेटिव्ह समजून जनमाणसात मिसळतो त्यामुळेच कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे बोलले जात आहे तसेच नगरपालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहर सॅनिटाईज व्हावे व कोरोनाची नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाढत आहे .
चोपडा तालुक्याच्या रुग्णसंख्येने आतापर्यंत सहा हजाराचा टप्पा पूर्ण केला असून मृत्यु शंभरीच्या जवळपास आहे तरी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे व प्रशासनाने शंभर टक्के नागरिकांना सहकार्य करावे अशा प्रकारचे त्यांनी आवाहन केले .
सदर भेटीप्रसंगी प्रांत सीमा अहिरे , तहसीलदार अनिल गावित , नायब तहसीलदार राजेश पउळ , मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर , उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील ,शहर पोलीस स्टेशन पीआय अवतारसिंग चव्हाण ,नगर पालिका गटनेते जीवन चौधरी आदी उपस्थित होते….












