जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सावत्र वागणूक का ? असा कर्मचाऱ्यांच्या सवाल !
चोपडा प्रतिनिधी :————–
सध्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हास्तरासह ग्रामीण भागातील डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी कोराना विषाणू विरोधात जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्सही अलर्ट राहून रात्रंदिवस सेवा देत आहेत .

जीव धोक्यात घालून कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत, बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे, कोविडच्या टेस्टिंग करणे पासुन ते पॉझिटिव्ह व्यक्तींना होमक्वारेनटाईन करणे, त्यांच्या घरावर होमक्वारेनटाईनचा स्टिकर लावणे, कोरोना बाबत जनजागृती करणे, कोव्हिडं 19 लसीकरण करणे.. यासह अनेक कामे एकाच वेळेस करावयास लागत असल्याने, कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत होत आहे आणि दिवस-रात्र काम करूनही आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही, तथा जिल्हा परिषद कडुन विविध अडीअडचणी पुर्ण केल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत व वेळेवर पगार मिळावा अशीही अपेक्षा संघटनेकडून वारंवार करण्यात येत आहे,
इतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर तेही बिनचूक होतात मग आरोग्य कर्मचाऱ्यांनाच का वेठीस धरले जाते ?
असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला जात आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर लागलीच शिकाऊ काळ देण्यात येतो तरीदेखील चार ते पाच वर्षे उलटून देखील अजूनही शिकाऊ काळ मंजूर झालेला नाही तसेच पहिली , दुसरी व तिसरी कालबद्धता अजूनही लागू केली नाही तसेच विस्ताराधिकारी , एच ए , एल एच व्ही या पदांचे प्रमोशनही नाही,आरोग्य सेवक व सेविका यांचे ही प्रमोशन नाही, मागील पाच वर्षापासून कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी देखील जाहीर केली गेलेली नाही,
स्थायी कर्मचाऱ्यांची यादी अजूनही मंजूर केली गेली नाही तसेच हिंदी – मराठी भाषा सुटचे प्रमाणपत्र अजूनही मिळालेले नाही अशा विविध प्रकारच्या मागण्या आरोग्य संघटनेकडून करण्यात आल्या आहेत .
मागण्या लवकरात लवकर मंजूर व्हाव्यात व वेळेवर पगार व्हावेत व कर्मचाऱ्यांच्या भावना ही समजून घ्याव्यात अशी माफक अपेक्षा आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे तरी वरिष्ठांनी दखल घ्यावी असेही सूचित करण्यात आले आहे ..












