मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनो ,
तुम्हाला कावळा सुद्धा शिवणार नाही

मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनो ,
तुम्हाला कावळा सुद्धा शिवणार नाही !

आरोग्यम् परमो सन्तोष : परमं धनम ! विश्वास : परमं मितं राष्ट्रसेवा परं सुखम !!

जीवनातील सर्वात उत्तम लाभ म्हणजे चांगले आरोग्य , सर्वोत्कृष्ट धन म्हणजे समाधान , सर्वोत्कृष्ट मित्र म्हणजे परस्परांवरील विश्वास आणि सर्वोत्कृष्ट सुख म्हणजे राष्ट्रसेवा …. असा वरील सुभाषिताचा अर्थ आहे .
परंतू आजची परिस्थिती काय आहे ? जीवनातील सर्वोत्कृष्ट लाभ म्हणजे पैसा , सर्वोत्कृष्ट धन म्हणजे पैसा , सर्वोत्कृष्ट मित्र म्हणजे पैसा आणि सर्वोत्कृष्ट सुख म्हणजे ही पैसाच …..पैसा… पैसा …आणि फक्त पैसा… कसाही , कोणत्याही मार्गाने , कुणाचाही पैसा आपण फक्त ओढायचा , नव्हे ओरबाडायचा आणि आपल्या ताब्यात घ्यायचा . आपल्या पुढच्या सात पिढ्याच नव्हे तर शंभर पिढ्यांसाठी लागणारी संपत्ती आत्ताच …. याच कोरोनाचा काळात … गोळा करून ठेवायची असा जणू काहींनी चंगच बांधलेला दिसतोय …


पैशाने जगातील प्रत्येक गोष्ट विकत घेता येते अशी प्रत्येकाची खात्री आहे . आरोग्य असो वा समाधान ,कुटुंब सौख्य असो की मान-सन्मान या जगात कोणतीही अशी गोष्ट नाही की जे पैसे फेकल्यावर मिळू शकत नाही अशी प्रत्येकाची खात्री झालेली आहे .अशा एका विचित्र कालखंडामध्ये मानवी जीवनमूल्ये सर्रास पायदळी तुडवून काही लोक पैसा गोळा करायच्या मागे लागले आहेत , या वृत्तीचे प्रकट रूप म्हणजे भ्रष्टाचार , काळाबाजार…
कोविड -19 महामारीत रुग्णांचे जीव वाचविण्यात खारीचा वाटा उचलणे ही पण एक मोठी समाजसेवाच होय .. पण समाजसेवेचा बुरखा घालून गरिबांचे लक्तरे तोडणारे काही डोमकावळे आज चोच धरून बसले आहेत . जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुका संपूर्ण राज्यात आकडेवारीच्या बाबतीत चर्चेचा विषय ठरला असतांना आकडेवारी थांबता – थांबेना अन त्यासोबत काळाबाजार ही थांबेना .


डॉक्टरांस देव माणूस संबोधले जाते मग काही देवांना पैशांचा एवढा हव्यास का ? असाही प्रश्न सहज निर्माण होणे स्वाभाविकच आहे . सिटीस्कॅनचे शासकीय दर अठराशे रुपये असताना गरीब रुग्णांकडून रुपये 2500 , रुपये 3000 , रुपये 4000 पर्यंत घेताना तुमच्या हातांना लकवा कसा झाला नाही ? चुकीचे कर्म करताना तुमचे मन कसे धजावते ? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे .
भ्रष्टाचार – काळाबाजार कुठे करावा याचा थोडाफार सारासार विचार असावा. वास्तविक पाहता केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी असोसिएशन तर्फे घोषित केले आहे की रेमडीसीवर इंजेक्शन बाराशे रुपयाच्या वर कोणीही विकणार नाही तरीही काळाबाजार सुरूच … जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांनी नवीन गाईडलाईन जारी केली की ,खरेदी किंमत + 10% + जीएसटी यानुसार इंजेक्शनची विक्री करावी . तर यावर काही बिन्डोक लोकांनी कृत्रिम टंचाई निर्माण करून रुपये बाराशेचे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करून रुपये 3000 ते 4000 रुपयात सर्रास विक्री करीत आहेत .अशा काही डोमकावळ्यांना लवकर कोरोनाची लागण होवो ..जो व्यक्ती मरणासन्न अवस्थेत शेवटची घटीका मोजत आहे त्याला ताबडतोब औषधोपचार उपलब्ध करून देणे हा खरा माणुसकी धर्म होय आणि तुम्ही माणुसकी गहाण ठेवून फक्त पैशांच्या हव्यासापोटी मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला तुम्हाला थोडीशीही शरम कशी वाटत नाही ? मेल्यानंतर पितृपक्षात तुमच्या पिंडीला कावळा सुद्धा शिवणार नाही ! हे लक्षात घ्या …. अरे जनाची नाही तर थोडी मनाची तर ठेवा … मरणारा कोणाचा तरी बाप आई ,भाऊ-बहीण ,पती-पत्नी असतोच ना ….मग तुम्ही माणूस असून सुद्धा इतकी राक्षसी वृत्ती तुमच्यात आली तरी कुठून ?
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ! या उक्तीचा विसर पडला की काय ?
कोविडच्या नावाखाली वेगवेगळ्या माध्यमातून काळाबाजार करताना तुमचे कोवळे मन कसे धजावतेरे ! नुसते रेमडीसीवरचा विषय सोडा …. सर्वच छोट्या-मोठ्या घटनात , बाबतीत लाखो तक्रारी जनमानसातून येतात ही फार मोठी शोकांतिका आहे ..
व्यवहारात ठरल्याप्रमाणे पैसा घेणे हा झाला शुद्ध व्यवहार पण त्याही पलीकडे घेणे ही झाली शुद्ध फसवणूक – लुबाडणूक – काळाबाजार ….
मागील काही दिवसांपासून काही पंटर , काही टोळ्या रेमडीसीवरच्या काळाबाजार करण्यात सक्रिय झाल्या आहेत . त्यांचा त्वरित बंदोबस्त व्हावा अन्यथा अजून अनेक रुग्णांना आपले प्राण रेमडीसीवर वेळेवर न मिळाल्यामुळे गमवावे लागतील हे निश्चितच …
एक एप्रिल रोजी नगरपालिकेच्या सभागृहात खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राऊत यांनी अनेक दिलासादायक निर्णय घेतले पण त्याची अंमलबजावणी आजही मात्र शून्य दिसून येत आहे त्यात सिटीस्कॅन केंद्राबाहेर रेट बोर्ड लावणे व रुग्णांना पक्के बिल देणे , खाजगी हॉस्पिटलच्या दर्शनी भागात दर पत्रक लावणे व रुग्णांना पक्के बिल अदा करणे ,रेमडीसीवर इंजेक्शन फक्त बाराशे रुपयात विक्री करणे पण अजूनही वरील निर्णयात 100 % अंमलबजावणी दिसून आली नाही …
जोपर्यंत प्रशासन एखाद्यावर कारवाईचा बडगा अवलंबणार नाही तोपर्यंत काळाबाजारांचा पेव फोफावणारच ….. प्रशासन नमती बाजू का घेते ? हा एक यक्षप्रश्नच आहे …

आर डी पाटील ( पत्रकार )
9860519006 , 8999671658

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More