लबाड लांडगं सोंग करतंय ! कोरोनाच्या नावाखाली लूट करतंय ?

लबाड लांडगं सोंग करतंय ! कोरोनाच्या नावाखाली लूट करतंय ?

सचिन जैस्वाल ( पत्रकार )

लहानपणी शाळेत असताना एका शिकारी लांडग्याची कथा ऐकली होती . ती फक्त बोधकथाचं नव्हती , तर शिकवण पण होती , साक्षात्कार होता पण आज दुर्दैवाने भलतच उलटं घडतंय.कळप राखायची हमी दिलेल्यानीच या लांडग्यांच्या घशात निष्पापांना घालायला सुरुवात केली आहे.यातही लांडग्यांनी एक खेळी केली साऱ्या राखोळी करणाऱ्यांना आमिष देऊन मांडवलीला भाग पाडले आणि त्यांना त्या त्या कळपाच्या म्होरक्या ठरवून टाकले.हे म्होरके मोठ्या फुशारकीने आपापल्या कळपाना या वाघदादा,सिंह अण्णांचे पोवाडे गाऊन दाखवू लागले.दर एक कळपाला अशी भूल देण्यातआली,पण या कळपांना कसा बरं विसर पडला असेल की,रक्तपिपासू भक्षकाने कितीही रक्षकाचे सोंग पांघरले तरी वाघ - लांडग्यांना शेळ्यामेंढ्याबद्दलचा कळवळा किती बरे विश्वसनीय असू शकतो ? जंगल कोणतेही असो , झाडा पहाडाचं की सिमेंट काँक्रीटचं . गरीब जीवांचंच जगणं असुरक्षित असत. त्यांच्यावरच भक्षकांचा डोळा असतोच. त्यांनी कितीही रक्षणाचं लबाड सोंग घेतलं तरी ते त्यांचे पालनकर्ते होऊच शकत नाही.शुभ्र बगळ्याने कितीही एका पायावर उभा राहून साधनेच्या सोंगाची जपमाळ जपली तरी त्याचे चित्त मात्र माशांवरचं असतं न्यायाच्या वितरणासाठी सोज्वळतेची सात्विक दृष्टी आणि संवेदनेची तीव्र कणव असावी लागते. अशावेळी लबाड लांडग्यांच्या सात्विक सोज्वळतेचे सोंग उघडे पडतेच. हत्ती,घोडे,गाय,म्हैस,वानर,जिराफ झेब्रा,रानगवे,ससा,हरिण,गेंडा कधी एकमेकांना खात नाहीत. टिटवी, मोर,कावळे,चिमणी, पोपट कबुतरे हे कधीच एकमेकांचे शत्रू नसतात. फक्त कधी संधीसाधू कोल्हे नि लबाड लोंबड्या मात्र याला अपवाद असतात म्हणून अवघे जीवन असुरक्षित झाले आहे.

चिऊने काऊला आणि काऊने चिऊला संकटसमयी मदत न केल्याची गोष्ट आम्हाला सांगितले जाते पण याच भयानक जंगलात साळुंखीने सापाचे शिकारी डोळे फोडल्याच्या मुंग्यांनी माजलेल्या हत्तीला लोळवल्याच्या,अनेक शक्तिशाली कथा ऐकल्याच नाही तर बघितल्याही आहेत.हे जंगल आणखी अशांत होण्यापूर्वी सर्व अहिंसक प्राण्यांनी लबाड लांडग्यांविरुद्ध मोर्चाला कूच करायलाच हवे. नाहीतर एके दिवशी तुमच्याही बळी जाईल हे ही सत्य नाकारता येणार नाही. शिर्डीचे साईबाबा अनेकांचे दैवत आहेत .ते भक्तांत कधीही भेदभाव करीत नाहीत .धर्म , जात , गरीब व श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना निकोप आणि निस्वार्थ आशीर्वादरूपी उपचार करतात.

डॉक्टरांना आपण देव मानतो.शिर्डीचा साई देवरूपी माणूसच होता. त्यांच्या आशीर्वादाने अनेक रुग्णांचे आजार श्रद्धेने ( फुकटात ) बरे होतात . मग शिर्डीच्या साईला डॉक्टर म्हणणे वावगे होणार नाही. आपल्याच जन्मभूमीत वाढलेले व कर्मभूमीत पोसलेले काही डॉक्टररुपी साई वरील श्रद्धा ढळण्याचं नेमकं कारण काय ? आत्मपरीक्षण व्हावे ? डॉक्टर हा भगवान, साई ,अल्लाह रुपी देवच असतो मग जनरल वॉर्डच्या रुग्णास आय सी यु चे बिल लावणे , ईसीजी न करता तीन-तीन ईसीजीचे खोटे बिल लावणे , रुग्णाला स्पर्श न करता अव्वाचे सव्वा बिल घेणे असे प्रकार शिर्डीच्या साई दरबारात कधीच घडत नाहीत आणि घडणार पण नाहीत . कारण भक्तांची साई वर अढळ अशी श्रद्धा असून शिर्डीचे साई भक्तांसाठी माईची भूमिका बजावत आहेत. पण आमचे देवरूपी काही साई माई विसरून कोरोनाचा काळात फक्त कमाई च्या मागे लागलेले दिसून येत आहेत. लक्षात ठेवा जनता भोळी - भाबडी नक्कीच असते पण जर का एकदा उद्रेक झाला की , तुमच्या कमाईतला माई विसरून तुमच्यातला देवरूपी *साई* च्या पुढे *क* लावून *क *साई* म्हणून संबोधतील .संबोधतील म्हणणं जरा चुकीचेच होईल. सर्वच म्हणत आहेत पण धजावत कोणीच नाहीये.

।।। शिर्डीच्या साई दरबारी श्रद्धा - सबुरी हे ब्रीद आहे . तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणून कोरोनाचा नावाखाली गोरगरिबांची लयलूट करणे योग्य नव्हे जरा सबुरीने घ्या ! अजूनही वेळ गेलेली नाही , सावरायला अजूनही अवधी आहे.शिर्डीच्या साईने डॉक्टर रुपी देवांना सेवा करण्याची जणूकाही कोरोना रुपी संधी तुम्हाला मिळवून दिली आहे , तिचा लबाड लांडगे बनून , सोंग करून , कोरोनाच्या नावाखाली चालवलेली लूट थांबवली पाहिजे ही माफक अपेक्षा ।।। रेमडीसीवरची कृत्रिम टंचाईवर भरपूर लिखाण झाले . वितरणासाठी यंत्रणा व काही नियमावली तयार करून वाटपही सुरू झाले . पण पांढऱ्या बगळ्यांना एकदा काळेधंदे करण्याची सवय झाली की ती मेल्याशिवाय जात नाही . याच्या जातिवंत पुरावा असा की रेमडीसीवर इंजेक्शनसाठी सिटीस्कॅन स्कोर , आधार कार्ड व डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन या तीन गोष्टी उपलब्ध केल्या की त्याला रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते , यात पण सर्वसामान्यांची लूट सुरूच.काळे धंदे , काळाबाजार पुन्हा सुरूच……

रुग्णांचे नातेवाईक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत मेडिकल वर उपलब्ध करून देतात व काही मेडिकल चालक व्यक्ती पाहून ( कच्च्या- पक्का ) एक नव्हे दोन रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जातात व रुग्णांच्या नावे एकच्या जागी 2 , दोनच्या जागी 4 इंजेक्शन दाखविले जातात आणि तेच रेमडीसीवर इंजेक्शन बाराशे रुपये ऐवजी काळ्या बाजारात पुन्हा रुपये 3000 व रुपये 4000 ने विक्री सुरूच आहे , यालाच म्हणतात ना काळे डोके
तालुक्यातील जनतेला जाहीर आवाहन आहे की ,मेडिसिन , रेमडीसीवर इंजेक्शन , हॉस्पिटल व इत्यादी सर्वच बाबींचे पक्के बिल ताब्यात घ्या आणि नेमलेल्या शासकीय ऑडीटर कडून सदर बिलाची खातरजमा करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More